बळीराजा चिंताग्रस्त
By Admin | Updated: June 21, 2014 00:57 IST2014-06-21T00:01:38+5:302014-06-21T00:57:05+5:30
श्रीनिवास भोसले, नांदेड मृग नक्षत्राला जवळपास पंधरा दिवस उलटले तरी पावसाने हजेरी लावली नाही़ पेरणी कशा करायची, पाऊस कधी पडणार, या चिंतेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे़
बळीराजा चिंताग्रस्त
श्रीनिवास भोसले, नांदेड
मृग नक्षत्राला जवळपास पंधरा दिवस उलटले तरी पावसाने हजेरी लावली नाही़ पेरणी कशा करायची, पाऊस कधी पडणार, या चिंतेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे़
जिल्ह्यात २०११ मध्ये १ जून ते १९ जून या कालावधीत एकूण २०६ तर सरासरी १२़ ८८ मि़ मी़ पर्जन्यमान झाले होते़ यावेळी जूनमध्ये देगलूर तालुक्यात सर्वाधिक ५१ मि़ मी तर भोकर तालुक्यात पावसाने हजेरी देखीललावली नव्हती़ २०१२ मध्ये निसर्गाने साथ दिली नव्हती त्यावेळी २० जूनपर्यंत पावसाचे दर्शनही झाले नव्हते़
मागील वर्षी २०१३ मध्ये निसर्गाने बऱ्यापैकी साथ दिल्याने आजघडीला जवळपास पेरण्या आटोपल्या होत्या़ तर बहुतांश शेतामध्ये पिके डोलायला लागली होती़ १ ते १९ जून २०१३ या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़
यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़ आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मी़ मी़ पाऊस झाला आहे़ यामध्ये नांदेड- १०़ ३२ मि़ मी़, कंधार- ४५़ ६६, भोकर- ३५़ ९५, लोहा- २७़ १७, मुदखेड- ८़ ६६, उमरी- १३़ ३७, अर्धापूर- ४ मि़ मी़, देगलूर- २६़१८, बिलोली- २५, मुखेड- ५०़ ७२, धर्माबाद- ६६, नायगाव- १९़ ८, किनवट- २७़ ८६, हदगाव- ८़ ४९, माहूर- २५़ ५ तर हिमायतनगर तालुक्यात १०़ ३४ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ आजपर्यंत सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात ६६ मि़ मी़ झाला तर अर्धापूर तालुक्यात सर्वात कमी ४ मि़ मी़ झाला आहे़
जिल्ह्यात २०१० मध्ये १०९ टक्के, २०११ मध्ये ७२़९२ टक्के तर २०१२ मध्ये ६९़१९ टक्के पाऊस झाला होता़ गतवर्षी २०१३ मध्ये ११४़ १७ टक्के पाऊस झाला होता़ या कालावधीत ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या़
गतवर्षी ९५ टक्के पेरणी
गतवर्षी २८ जूनअखेर जिल्ह्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती़ यामध्ये ज्वारी ७१ हजार ८०० हेक्टर, तुर ५० हजार ३०० हजार हे., मूग २५ हजार हे., उडीद २८ हजार १०० हेक्टर, सोयाबीन २ लाख ३३ हजार ९०० हे., गळीत धान्य १९०० हे., कापूस २ लाख ५९ हजार २०० हे.प्रमाणे पिकांची ६ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यावर्षी तुरळक ठिकाणी झाल्याचे चित्र आहे़ ही पेरणी काळ्या पाण्यावर केली़ पावसाला उशीर झाल्यास पदरमोड करुन बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांवर संकटच कोसळेल़
शेतकऱ्यांची झोप उडाली
पावसाअभावी शेतकऱ्यांची झोप उडाली असून रात्रीच्या वेळी उशिरा गावात गेले तर गाव सामसूम झाल्याचे दिसते़ मात्र, आज मध्यरात्रीपर्यंत गावात गेले तरी चावडीवर लोक पहायला मिळत आहेत़ दिवस - रात्र शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत़
शिक्षणाची निराशा
निसर्गाच्या आशेवर स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षीचे आर्थिक नियोजन लावता येत नाही़ या स्थितीला पेरणी नाही तर पीक काय येईल, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे़ मुलांना गावातील इंग्रजी शाळेत अथवा शहरात शिक्षणासाठी ठेवण्याची हिम्मत केवळ शेतीच्या जोरावर शेतकरी करतो़ सध्या सर्वत्र प्रवेशाची धांदल सुरू असली तरी शाळा, महाविद्यालयांत नेहमीसारखी गर्दी दिसत नाही़
उन्हाळी कापूस़़़
बहुतांश शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काळ्या पाण्यावर कापसाची लागवड केली़ दीड महिन्यांपासून कापूस जोपासता जोपासता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत़ येत्या आठवडाभरात मोठा पाऊस नाही झाला तर हे पीक जोपासणेही कठीण होणार आहे़
चाऱ्याचा प्रश्न गंभीऱ़़
ज्या भागात आजघडीला पावसाने हजेरीदेखील लावली नाही़ अशा भागात जनावरांच्या चाऱ्यांचा आणि पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे़ जूनच्या शेवटी माळरान, पडीक जमिनीमध्ये गवत वाढलेले असते, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न मिटत असतो़ परंतु आज स्थिती वेगळी असून एकही मोठा पाऊस झाला नसल्याने चाऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़