बजाज आॅटोच्या कामगारांना १० हजार रुपयांची पगारवाढ
By Admin | Updated: August 22, 2014 00:26 IST2014-08-22T00:24:54+5:302014-08-22T00:26:08+5:30
वाळूज महानगर : बजाज आॅटो कंपनीतील कामगारांना प्रतिमाह १० हजार ५० रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे.

बजाज आॅटोच्या कामगारांना १० हजार रुपयांची पगारवाढ
वाळूज महानगर : बजाज आॅटो कंपनीतील कामगारांना प्रतिमाह १० हजार ५० रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. यात ९,२०० रु. थेट व बाकीचे अप्रत्यक्षरीत्या मिळणार आहेत. ही पगारवाढ साडेतीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
कंपनी व्यवस्थापन व बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांच्यात कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात चर्चा होऊन कामगारांच्या मागणीवरून व्यवस्थापनाने आज झालेल्या बैठकीत कामगारांना पगारवाढ करण्यात आल्याचे जाहीर केले. मागील करारात ६,५०० रु. पगारवाढ होती. यावेळी ती १० हजार ५० रुपये करण्यात आली आहे.
शिवाय या करारात कामगारांना कामावर येण्यास ५ मिनिटे उशीर झाला की ६६ रुपये कापण्याची पद्धतही बंद करण्यात आली असून, कामगारांना अधिक सकस आहार मिळणार आहे. मागील करार ३१ जुलै रोजी संपला असला तरी हा करार १ आॅगस्टपासून कामगारांना लागू करण्यात आला असल्याने कामगारांचा एकही दिवस वाया जाणार
नाही.
या कार्यक्रमाला एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, सचिव प्रमोद फडणीस, कोषाध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत, उपाध्यक्ष प्रकाश मांडरे, काशीनाथ चौधरी, कार्याध्यक्ष विजय पवार, सहसचिव प्रभाकर भोसले, देवीदास पवार, सहकोषाध्यक्ष सत्यविजय देशमुख, माजी अध्यक्ष बाजीराव ठेगडे, विठ्ठल कांबळे, मोतीराम कांबळे, तर कंपनी व्यवस्थापनच्या वतीने उपाध्यक्ष कैलास झांझरी, दत्ता नार्वेकर तसेच असंख्य कामगार उपस्थित होते.
या पगारवाढीपैकी ९,२०० रु. प्रत्यक्ष, तर ८५० रु. अप्रत्यक्ष मिळणार आहेत. लग्न व शैक्षणिक कर्ज म्हणून ६०-६० हजार, तर दिवाळी उचल म्हणून ६ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच कॅशलेस पॉलिसीच्या नावाखाली प्रत्येक कामगाराचा प्रतिवर्षी १ लाखापासून ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा काढण्यात येणार आहे.