बॅडमिंटन, बॉक्सिंगलाही ‘बॅड पंच’ !

By Admin | Updated: March 16, 2015 00:50 IST2015-03-16T00:41:45+5:302015-03-16T00:50:30+5:30

महेश पाळणे, लातूर मैदानी व इतर खेळांसमवेत इनडोअर खेळांचेही क्रीडा संकुलात हाल बेहाल आहेत. बहुउद्देशीय इमारतीसह बॅडमिंटन हॉलमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव

Badminton, 'Bad Punch' for Boxing! | बॅडमिंटन, बॉक्सिंगलाही ‘बॅड पंच’ !

बॅडमिंटन, बॉक्सिंगलाही ‘बॅड पंच’ !


महेश पाळणे, लातूर
मैदानी व इतर खेळांसमवेत इनडोअर खेळांचेही क्रीडा संकुलात हाल बेहाल आहेत. बहुउद्देशीय इमारतीसह बॅडमिंटन हॉलमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने बॅडमिंटनसह बॉक्सिंग खेळालाही ‘बॅड पंच’ बसत आहे.
बॅडमिंटन हॉलमध्ये नुकतीच एलईडी लाईटची व्यवस्था करण्यात आली. प्रकाश व कोर्ट जरी उत्तम असले, तरी खेळाडूंना पिण्यासाठी मुबलक पाण्याची सोय नाही. त्यातच कोर्टशेजारी असलेल्या गॅलरीमुळे प्रशिक्षकांना सरावाअतिरिक्त कोणतेही ट्रेनिंग घेता येत नाही. बाजूला असलेल्या गॅलरीमुळे वॉर्मिंगअप व इतर कौशल्य शिकविण्यास अडचणी येत आहेत. बॅडमिंटन हॉलची स्वच्छताही नियमित होत नसल्याचे एका प्रशिक्षकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. गॅलरीमध्ये असलेली घाण तसेच त्या ठिकाणी असलेल्या जाळ्या यासह थुंकलेल्या पिचकाऱ्यांनी हॉलचा परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. बॅडमिंटन हॉलमधील स्वच्छतागृहांचीही नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे दुर्गंधी अधिक तीव्ररुप घेत आहे. बॅडमिंटन संघटनाच या हॉलची साफसफाई करून घेते. क्रीडा कार्यालयाने येथे असलेल्या कामगारासही कामावरून कमी केल्याने सध्या बॅडमिंटन हॉलचे ‘हाल’ अधिकच ‘बॅड’ झाले आहेत. बहुउद्देशीय इमारतीतही बॉक्सिंग व जिम्नॅस्टिक खेळांचा सराव चालतो. या ठिकाणीही पिण्याच्या पाण्याची सोय खेळाडूंकरिता नाही. त्यामुळे खेळाडूंना सरावास ब्रेक करून पाण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. या हॉलमधील स्वच्छतागृहेही अस्वच्छच असतात. बॉक्सिंग संघटना तर हा हॉल सोडण्याच्याच बेतात असल्याचे संघटनेकडून कळते. खेळाडूंची असलेली अल्प संख्या व संकुल समितीचे अमाप भाडे संघटनेला परवडणारे नसल्याचे संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
जिम्नॅस्टिक खेळाच्याही मॅट कुजल्या आहेत. या ठिकाणी शासनाचे प्रशिक्षण केंद्र जरी चालत असले, तरी सुविधांच्या कमतरतेने याही खेळाची अवस्था बिकटच दिसते. काही दिवसांपूर्वी या हॉलमधील विद्युत व्यवस्था तर जवळपास चार महिने बंद असल्याची माहिती ‘लोकमत’ने चालविलेल्या या वृत्तमालिकेमुळे समोर आली आहे.
या बहुउद्देशीय इमारतीत असलेल्या अंडर ग्राऊंडचे मेन केबल लाईन खराब झाल्यामुळे सध्या या इमारतीला वसतिगृहातून तात्पुरत्या स्वरूपात लाईट देण्यात आली आहे. त्यामुळे या भागात विजेचा दाब कमी-जास्त होत आहे. एकंदरित, या सर्वच अडचणींमुळे इनडोअर खेळांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांचे जणू डोअरच बंद झाले आहे.

Web Title: Badminton, 'Bad Punch' for Boxing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.