चौफुलीवर जन्मले कन्यारत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:14 IST2017-10-04T01:14:41+5:302017-10-04T01:14:41+5:30
प्रसूती वेदनेने तडफडणाºया २५ वर्षीय असहाय मातेच्या मदतीला धावलेल्या महिला प्रवाशांनी तिची झाडाच्या आडोशाला सुखरूप प्रसूती केली. वाळूज-औरंगाबाद महामार्गावरील लिंक रोड चौफुलीवर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही सृजनाची क्रिया घडली.

चौफुलीवर जन्मले कन्यारत्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : प्रसूती वेदनेने तडफडणा-या २५ वर्षीय असहाय मातेच्या मदतीला धावलेल्या महिला प्रवाशांनी तिची झाडाच्या आडोशाला सुखरूप प्रसूती केली. वाळूज-औरंगाबाद महामार्गावरील लिंक रोड चौफुलीवर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही सृजनाची क्रिया घडली. या महिलेने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळ व बाळंतीण सुखरूप असून १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी या मायलेकीस शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सपना भुसकर भोसले (रा. जोगेश्वरी) यांना प्रसूती वेदना सुरूझाल्यामुळे पती भुसकर भोसले त्यांच्यासह अॅपेरिक्षातून बजाजनगरात रुग्णालयाकडे निघाले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास ते बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी कागदपत्रांची मागणी केली. पतीने कागदपत्र घरीच राहिल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. म्हणून ते दोघे पुन्हा रिक्षाने शासकीय रुग्णालयात निघाले. मात्र आदळ आपटीचा रस्ता व प्रसूतीच्या वेदना तीव्र झाल्यामुळे रस्त्यावरच रिक्षा थांबवावी लागली.
महिला प्रवाशांनी केली मदत
रिक्षा थांबताच भुसकर भोसले व रिक्षाचालक बाळू फुके यांनी मदतीसाठी याचना केली. या चौफुलीवर लासूर स्टेशनकडे जाण्यासाठी थांबलेल्या मंदा जयराम मुंजाळ (रा. खडक नारळा) व इतर महिला मदतीसाठी धावून आल्या. वेदनेने त्रासलेल्या मातेस त्यांनी रिक्षातून बाहेर घेत रस्त्यालगतच्या झाडाच्या आडोशाला नेले. तेथे चादरी व कपडे लावून तात्पुरती व्यवस्था केली. हा प्रसंग पाहून सिग्नलवर कचरा वेचणा-या एका वृद्ध महिलेने धाव घेत दायीची भूमिका पार पाडली.