‘बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद अस्सल, शत्रुत्व पेरत नाही’
By Admin | Updated: April 16, 2016 01:47 IST2016-04-16T01:05:08+5:302016-04-16T01:47:34+5:30
औरंगाबाद : ‘आरएसएस- भाजपवाल्यांना त्यांचा राष्ट्रवाद लखलाभ. मी त्यांचा शत्रू नाही; पण हितचिंतक तर मुळीच होऊ शकत नाही. आंबेडकरवाद माझ्या मेंदूच्या कणाकणांत भरलेला आहे.

‘बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद अस्सल, शत्रुत्व पेरत नाही’
औरंगाबाद : ‘आरएसएस- भाजपवाल्यांना त्यांचा राष्ट्रवाद लखलाभ. मी त्यांचा शत्रू नाही; पण हितचिंतक तर मुळीच होऊ शकत नाही. आंबेडकरवाद माझ्या मेंदूच्या कणाकणांत भरलेला आहे. कारण बाबासाहेबांचा राष्ट्रवाद सगळ्या राष्ट्रभक्तांपेक्षा अस्सल आहे. त्यांचा राष्ट्रवाद माणूस घडवतो. शत्रुत्व तर अजिबात पेरत नाही,’ असे प्रतिपादन आज येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, सिडको एन-१, एन-२, एन-३ व एन-४ च्या वतीने आयोजित मुख्य प्रबोधनात्मक कार्यक्रमात जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित राष्ट्रवाद’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे होते. सबनीस यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील दु:खाच्या प्रसंगांची नोंद घेतली आणि ते सांगताना क्षणभर गहिवरले. त्यांचा कंठ दाटून आला. ‘सगळ्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसणाऱ्या बाबासाहेबांच्या डोळ्यांतील अश्रू मात्र कुणालाच दिसले नाहीत; पण तरीही माणसे किती बलशाली होऊ शकतात, हे बाबासाहेबांवरून लक्षात येते. बाबासाहेबांची संवेदनशीलता टोकाची आहे. त्यांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्सा टोकाची आहे. ते सर्व जातीयवादाच्या विरोधात होते,’ असे ते म्हणाले.
सबनीस म्हणाले की, या देशात सत्याचा काळाबाजार मांडला गेला. अडीच हजार वर्षांपासून संस्कृतीच्या नावाखाली हे असत्य रुजविले गेले. त्यालाच श्रेष्ठ असे मानले गेले. हा क्रौर्याचा इतिहास असून, तो कधीही हिंदू धर्माला शोभादायक नाही. हे एक कल्चरल करप्शनचे कुरूप प्रकरण आहे. आजही धर्मांधता, उन्माद चालू आहे. सावरकरांचा राष्ट्रवाद सेक्युलर नाही. गांधींचा राष्ट्रवाद संभ्रमित आहे. गांधी-नेहरू आणि बाबासाहेबांमध्ये संवादाच्या अनेक जागा आढळून येतात. गांधी-नेहरू यांच्यामुळेच बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली, हेही नाकारता येत नाही. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते बुद्ध, फुले आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. गायक गौतम गवई यांनी स्वागतगीत गायले. कवी नारायण जाधव यांनी ‘काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या लेकी’ ही कविता सादर करून प्रशंसा मिळवली. रतन धनेधर यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर झिने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुजा झिने यांनी आभार मानले, सुरेश दांडगे, अशोक गवळी, चरणदास बनसोड, अनिता हिवाळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.