आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक
By विजय सरवदे | Updated: January 19, 2024 18:15 IST2024-01-19T18:14:33+5:302024-01-19T18:15:20+5:30
आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक असताना ‘ॲलोपॅथी’चा उपचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे फर्मान

आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक
छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’ असा उल्लेख करावा. एवढेच नाही, तर ‘ॲलोपॅथी’ची योग्य अर्हता प्राप्त नसतानादेखील काही जण ‘ॲलोपॅथी’चा उपचार करतात, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे फर्मान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे यांनी जारी केले असून, याविरुद्ध ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या ‘निमा’ या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे यांनी १५ जानेवारी रोजी गंगापूर तालुक्यातील ‘ॲलोपॅथीक’ डॉक्टर वगळता उर्वरित ‘बीएएमएस’, ‘बीयूएमएस’, ‘बीएचएमएस’, ‘डीएचएमएस’, या पदवीधारक वैद्यकीय व्यावसायिकांना एका नोटिसीद्वारे इशारा दिला आहे की, आपले शिक्षण ज्या ‘पॅथी’तून झाले, त्या ‘पॅथी’ची प्रॅक्टीस सोडून ‘ॲलोपॅथी’चा उपचार रुग्णांवर करतात. अर्हता नसताना देखील ‘ॲलोपॅथी’चा उपचार देणे, आपल्या दवाखान्यात एमबीबीएस अथवा एमडी डॉक्टरांच्या भेटी दाखवून भडक जाहिराती करून रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनात आले आहे. अशा वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, डॉ. तुपे यांच्या या पत्रावर ‘निमा’ (एनआयएमए) संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र झोल व सचिव डॉ. ज्ञानेश्वर चौधर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय व्यवसायाची कसलीही पदवी नसताना तालुक्यात अनेक बंगालीबाबू राजरोसपणे दवाखाने चालवत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करायचे सोडून जे महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषदेकडे (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन) नोंदणीकृत आहेत, अशा वैद्यकीय व्यावसायिकांना नोटिसा देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये ‘बीएएमएस’ डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत, याचा विसर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे यांना पडलेला दिसतोय, असे डॉ. चौधर यांचे म्हणणे आहे.
‘ॲलोपॅथी’चा ब्रीज कोर्स आवश्यक
गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे यांच्या पत्रामुळे ‘बीएएमएस’ डॉक्टरांसंबंधी समाजात गैरसमज पसरला असून यावर ‘निमा’ संघटनेने आक्षेप घेतला आहे, याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘ॲलोपॅथी’चा उपचार अथवा औषधी लिहून देण्यासाठी ‘बीएएमएस’धारकांना देखील ‘ब्रीज कोर्स’ अनिवार्य आहे. ज्यांनी हा कोर्स केला असेल, ते ‘ॲलोपॅथी’ची प्रॅक्टीस करू शकतात. आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांना आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावण्याचा अधिकार आहे.