आव्हाड यांनी मागितला मतांचा जोगवा!
By Admin | Updated: June 24, 2014 01:07 IST2014-06-24T01:01:06+5:302014-06-24T01:07:33+5:30
औरंगाबाद : ‘कॉफी विथ स्टुडंट’ या कार्यक्रमासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले.

आव्हाड यांनी मागितला मतांचा जोगवा!
औरंगाबाद : ‘कॉफी विथ स्टुडंट’ या कार्यक्रमासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर चक्क मतांचा जोगवा मागितला. राज्यात विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आलेल्या असताना इंटर्न डॉक्टरांनी मानधन वाढविण्याची मागणी त्यांच्याकडे केली. तेव्हा आव्हाड यांनी आम्हाला मतदान करा, २०१५ मध्ये मागणी पूर्ण करू अशी घोषणा केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर डॉ. आव्हाड प्रथमच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आरोग्य विभाग यापुढे निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वसतिगृहात पिण्याचे पाणी मिळत नाही, स्वच्छतागृह कायम घाणेरडे असतात. मेसमध्ये मिळणारे निकृष्ट जेवण, तसेच वसतिगृहात सुरक्षेचा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न पाहून आव्हाड यांनी अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे यांना चांगलेच झापले आणि वसतिगृहाशी संबंधित सर्व प्रश्न २४ तासांत सोडविण्याचे आदेश दिले. यावेळी रेडिओलॉजी विभागातील निवासी डॉक्टर विद्यार्थिनीला एका नगरसेवकाने मारहाण केल्याच्या घटनेनंतर तक्रार करूनही प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या घटनेचा त्यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठातांना जाब विचारत तातडीने गुन्हे नोंदविण्याची सूचना केली. पॅथॉलॉजी विभागात विद्यार्थ्यांना मायक्रोस्कोप वापरण्यास दिला जात नसल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले तेव्हा त्यांनी तातडीने विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू यांच्याकडे असे का होते? अशी विचारणा करीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश वैद्यकीय संचालकांना दिले. कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आमच्या पक्षाला मते द्या, अशी वारंवार मागणी केली. त्यामुळे मंत्री आपले प्रश्न सोडविण्यासाठी आले की मते मागायला, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे, डॉ. सुरेश बारपांडे, डॉ. अरविंद गायकवाड उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षकांची पदे
दोन महिन्यांत भरणार
1घाटीसह राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षक, परिचारिका आणि तंत्रज्ञांची १ हजार ५०० रिक्त पदे दोन महिन्यांत भरण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना दिली.
2हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा, कर्करोग रुग्णालय, मूत्रपिंड विकार, मूत्ररोग, ट्रॉमा केअर, अशा सुपर स्पेशालिटी विभागातील डॉक्टरांची पदे भरण्यासाठी लवकरच सुपर स्पेशालिटी तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
3औषध वैद्यकशास्त्र, कर्करोग रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी तेथील रुग्णांशी संवाद साधला. दोन्ही विभाग उत्कृष्ट असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
4निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, एमबीबीएस विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील समस्या सोडविण्यासाठी अधिष्ठाता आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.