आचारसंहितेचा अडसर : वेळेत समुपदेशन न झाल्याने लांबल्या नियुक्त्या
औरंगाबाद : जिल्ह्यातील २०१ समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण घेऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेकडून समुपदेशन प्रक्रिया वेळेत राबविण्यात आली नाही. त्यात ग्रामपंचायतीची आचारसंहिता जाहीर झाल्याने नियुक्त्यांना ब्रेक लागला असून, सोमवारी होणारी समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
जिल्ह्यात ५१ आरोग्य केंद्रे व २७९ आरोग्य उपकेंद्रे आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आता उपकेंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्रात श्रेणीवर्धित करण्यात येत आहे. त्यामुळे आयुर्वेद, युनानी डाॅक्टरांची मार्चमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरपदी (सीएचओ) निवड करून त्यांना आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे ॲलोपॅथीच्या ब्रीज कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. सीएचओंच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम होईल, असा विश्वास डाॅ. सुधीर शेळके यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात ६१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत नियुक्त्यांना ब्रेक लागला आहे. आरोग्याच्या संचिकांचे गांभीर्य ओळखून वेळेत निकाली निघाव्यात अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली, तर ‘सीएचओं’ना इच्छित ठिकाणे मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह, मंत्री, लोकप्रतिनिधींकडून शिफारशी, लाॅबिंग असताना गुणवत्तेवर आधारित समुपदेशन पारदर्शी व्हावे, अशी अपेक्षा ‘सीएचओं’नी व्यक्त केली.
शेजारील जिल्ह्यात प्रक्रिया पूर्ण
भारतीय वैद्यक परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेला सहा महिन्यांचा ब्रीज कोर्स पूर्ण केलेल्या डाॅक्टरांची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जिल्ह्यात २०१ उपकेंद्रांत नियुक्ती द्यावी. त्यासाठी ७ ते १० डिसेंबरदरम्यान समुदेशन घेण्याची ‘एनएचएम’ची सूचना होती. शेजारील जिल्ह्यांत या नियुक्त्या वेळेत झाल्याने डाॅक्टर उपकेंद्रांत रुजू झाले. मात्र, सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी यासंबंधीची संचिका प्रलंबित ठेवल्याने वेळेत समुपदेशन होऊ शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
---
संचिका प्रलंबित ठेवल्याने समुपदेशन पुढे ढकलले
--
सीईओंनी १४ डिसेंबरला समुपदेशन प्रक्रिया राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या, तर ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे सिडको एन-५ आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात सोमवारी सकाळी दहा वाजता नियोजित समुपदेशन प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक स्वतंत्र कळविण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी कळविले आहे.