सहायक फौजदाराची कार फोडून पळविले पावती पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:28 IST2018-04-17T17:27:29+5:302018-04-17T17:28:41+5:30
वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराच्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारटेप आणि पावती पुस्तक चोरून नेले.

सहायक फौजदाराची कार फोडून पळविले पावती पुस्तक
औरंगाबाद : वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराच्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारटेप आणि पावती पुस्तक चोरून नेले. ही घटना १४ एप्रिल रोजी दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान भडकलगेट येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
शहर वाहतूक शाखेतील सहायक फौजदार धनाजी सुखदेव आढाव हे १४ एप्रिल रोजी भडकलगेट येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ कर्तव्यावर होते. त्यांनी त्यांची खाजगी कार दुपारी ३ वाजता प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर उभी केली. रात्री ११ वाजेच्या सुमारास काम आटोपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असता कारची काच फोडून चोरट्यांनी आतील कारटेप आणि सरकारी पावती पुस्तक क्रमांक ७४६ (पावती नंबर २०८५०१ ते २०८५५०), सरकारी शिक्के व कागदपत्रांची बॅग चोरून नेल्याचे समजले. त्यांनी या घटनेची तक्रार सिटीचौक पोलिसात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर तपास करीत आहेत.