औसा, उदगीरात रस्सीखेच !

By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-11T00:02:36+5:302014-07-11T00:58:40+5:30

उदगीर/निलंगा/औसा : जिल्ह्यातील उदगीर, औसा व निलंगा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़

Ausa, auspicious rope! | औसा, उदगीरात रस्सीखेच !

औसा, उदगीरात रस्सीखेच !

उदगीर/निलंगा/औसा : जिल्ह्यातील उदगीर, औसा व निलंगा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्यानुसार गुरुवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी उदगीर व औश्यात नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोघांनी अर्ज दाखल केले आहेत़ तर निलंग्यातही दोन अर्ज दाखल झाले आहेत़
उदगीर, औसा व निलंगा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवड १६ जुलै रोजी करण्यात येणार आहे़ त्याअनुषंगाने १० जुलै रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता़ या मुदतीत औसा पालिकेतून काँग्रेसच्या नीता सूर्यवंशी व मंजुषा हजारे या दोन सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत़ त्यांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती मुख्याधिकारी मल्लिकार्जून पाटील यांनी दिली़ औसा पालिकेचे नगराध्यक्षपद यावेळी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे़
निलंगा पालिकेतील नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सुटले आहे़ याठिकाणी काँग्रेसकडे पूर्ण बहुमत असून, पक्षाने यावेळी विद्या धानोरकर यांना संधी दिली आहे़ गुरुवारी काँग्रेसकडून त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे़ त्यामुळे त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे़ तरीही भाजपाकडून वसुंधरा शिंगाडे यांनीही अर्ज दाखल केला आहे़ परंतु, त्यांच्याकडे केवळ तीनच सदस्य असल्याने नगराध्यक्ष बनण्यात अडचणी आहेत़
उदगीर पालिकेतील नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषांसाठी सुटले आहे़ येथे विद्यमान नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसकडून आपली दावेदारी सांगितली आहे़
शिवाय, काँग्रेसच्याच बस्वराज बागबंदे यांनीही अर्ज दाखल केला आहे़ उदगीरसह निलंगा व औसा पालिकेच्या नगराध्यक्षांची निवड १६ जुलै रोजी करण्यात येणार आहे़ तत्पूर्वी १५ जुलै रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे़ (वार्ताहर)
औशात रंगत़़़
औसा पालिकेत राजकीय समीकरणे बदलून एका वेगळ्याच युतीने जन्म घेतला होता़ येथे ७ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ६ सदस्य असलेल्या काँग्रेस व ३ सदस्यांच्या भाजपाची युती झाली आहे़ सध्या अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद भाजपाकडे आहे़ दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील महिलांसाठी यावेळचे अध्यक्षपद राखीव आहे़ या प्रवर्गातील नीता सूर्यवंशी व मंजुषा हजारे या दोघीच सदस्या पालिकेत असून, त्या काँग्रेसच्याच आहेत़ त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, हे निश्चित आहे़ मात्र दोघांपैकी पक्ष कोणाला संधी देणार, याकडे मात्र नागरिकांचे लक्ष आहे़
निलंग्यात औपचारिकता..?
निलंगा पालिकेत काँग्रेसकडे पूर्ण बहुमत आहे़ १६ सदस्य काँग्रेसचे तर ३ सदस्य भाजपाचे आहेत़
काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी विद्या धानोरकर यांच्या रुपाने एकमेव उमेदवार दिला असल्याने त्यांचा मार्ग मोकळा आहे़
भाजपाच्या वसुंधरा शिंगाडे यांनीही अर्ज भरला असला तरी त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याने धानोरकर यांची औपचारिक निवड बाकी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे़
उदगीरात उत्सुकता़़़
उदगीर पालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ त्यामुळे येथून काँग्रेसच्याच इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत़ सध्या नगराध्यक्षपद भूषवीत असलेले राजेश्वर निटुरे यांनी पुन्हा इच्छा दर्शविली आहे़ तर बस्वराज बागबंदे यांनी यावेळी बदलासाठी पक्षाकडे आग्रह धरला आहे़ याठिकाणी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्येच जोरदार रस्सीखेच असल्याने उदगीरकरांचे लक्ष १६ जुलैकडे लागले आहे़

Web Title: Ausa, auspicious rope!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.