छत्रपती संभाजीनगर/खुलताबाद : खुलताबाद येथील औरंगजेब कबर परिसरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन चाेहोबाजूंनी खबरदारी घेत आहे. कबरीला तीनस्तरीय सुरक्षा कवच दिले आहे. तसेच खुलताबाद शहर आणि जवळपासच्या गावांमधील अंडरकरंटची माहिती मिळावी, यासाठी खासगी व्यक्तींची (हेर) नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी दिली.
खुलताबाद शहरातील औरंगजेबाची कबर संरक्षित स्मारक असून, ती केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या कबरीला संरक्षण आहे. मात्र, काही सामाजिक संघटनांकडून कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. कबर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त लावला आहे. जागोजागी नाकेबंदी केली असून, ओळख पटवूनच कबर परिसरात प्रवेश दिला जात आहे. बाहेरगावाहून इथे येऊन काही जण गडबड करू शकतात. ही बाब विचारात घेऊन काही जणांना जिल्हाबंदी केली आहे. पुरातत्त्व विभागालादेखील सूचना केल्या आहेत. कबरीच्या आजूबाजूला असलेल्या लोखंडी ग्रील्स सुरळीत आहेत की नाही, हे पाहण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.
कबरी भोवती लोखंडी सुरक्षा कवचयेथील औरंगजेबची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्याने एकीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला असताना बुधवारी कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये, यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले. या माध्यमातून कबरीचे सुरक्षा कवच वाढविण्यात आले आहे. मुघल सम्राट औरंगजेबचे गुरू सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्यात बाजूलाच औरंगजेबांची कबर आहे. जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्शनासाठी शेकडो भाविक येथे दररोज येतात. काही वर्षापूर्वीही औरंगजेबच्या कबरीवरून वाद झाला होता. त्यावेळी कबरीच्या पाठीमागील बाजूस कमी उंचीच्या संरक्षण भिंतीला लागून लोखंडी अँगल लावून हिरवा कपडा लावण्यात आला होता. नागपुरात सोमवारी राडा झाला. त्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून बुधवारी पुरातत्व विभागाने कबरीच्या पाठीमागील बाजूस असलेला हिरवा कपडा काढून त्या जागी लोखंडी पत्रे मारले आहेत. त्यामुळे कबरीच्या पाठीमागील बाजू अधिक सुरक्षित झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एक महिना विशेष बंदोबस्तजिल्ह्यातील खुलताबाद शहर व १ औरंगजेबाची कबर असलेला परिसर १८ एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेड झोन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने बुधवारी सायंकाळी जारी केले आहेत. या कालावधीदरम्यान पूर्ण खुलताबाद शहर हद्द व औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे स्वयंचलित ड्रोन उडविण्यास बंदी असणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २००३ च्या कलम १६३ (१), (३) अन्वये नागरिक, संघटनांना आदेशातून कळविण्यात आले आहे की, खुलताबाद शहर हद्द, औरंगजेब कबर परिसरात मानवी जीवितास, मालमत्तेची हानी होईल, अथवा कबर व आसपासच्या परिसरात धार्मिक प्रार्थना स्थळांसह रहिवासी, व्यापारी इमारती, दुकानांची हानी होईल. अथवा दंगल घडेल, असे कृत्य करणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. १ महिन्यापर्यंत तो सगळा परिसर सुरक्षेच्या निगराणीत असणार आहे.
शिंदे, पोटे, एकबोटे व आवारे यांना जिल्हाबंदीछत्रपती संभाजीनगर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचा वाद वाढल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आजवर चार पक्ष, संघटनांच्या नेत्यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांच्या अहवालावरून अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी संबंधितांना जिल्हा बंदीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी नितीन शिंदे, संभाजी महाराज प्रतिष्ठानचे नितीन पोटे, मिलिंद एकबोटे आणि धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे-पाटील यांचा समावेश आहे. त्यातील नितीन शिंदे यांना १२ मार्चपर्यंतच जिल्हा बंदी करण्यात आलेली होती. पोटे यांना २५ मार्चपर्यंत, आवारे आणि एकबोटे यांना ५ एप्रिलपर्यंत जिल्हा बंदी आहे.
जमाव, ड्रोन बंदी लागूजिल्ह्यात आधीच जमाव बंदी लागू आहे. आता ग्रामीण भागात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्याचे आदेश गुरुवारी जारी केले जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले.