औरंगाबादची ‘पॉवर’ वाढणार!
By Admin | Updated: May 30, 2014 01:02 IST2014-05-30T00:49:55+5:302014-05-30T01:02:58+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद वीज नाही म्हणून उद्योग बंद ठेवावा लागतोय, हा भूतकाळ झाला. मात्र, वर्तमानकाळात औरंगाबाद वीजपुरवठ्याच्या दृष्टीने पॉवरफुल बनत आहे.

औरंगाबादची ‘पॉवर’ वाढणार!
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद वीज नाही म्हणून उद्योग बंद ठेवावा लागतोय, हा भूतकाळ झाला. मात्र, वर्तमानकाळात औरंगाबाद वीजपुरवठ्याच्या दृष्टीने पॉवरफुल बनत आहे. ३६५ दिवस अखंड वीजपुरवठा करण्याची क्षमता महापारेषणने निर्माण केली आहे. डीएमआयसीची भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी विद्युत वाहिनीचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. चित्तेपिंपळगावपाठोपाठ एकतुनी येथे ७६५ के.व्ही.चे उपकेंद्र उभारणीला सुरुवात झाली आहे. याद्वारे औरंगाबाद, जालनाच नव्हे, तर भविष्यात पुणे, मुंबईलाही मराठवाड्याच्या राजधानीतून वीजपुरवठा होईल, असे चित्र आहे. आजघडीला औरंगाबाद जिल्ह्यात दररोज ९०० मेगावॅट, तर जालना जिल्ह्यास २३० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. डीएमआयसीमुळे भविष्यात औरंगाबादला आणखी १,५०० मेगावॅट, तर जालना येथील औद्योगिक वसाहतीला १०० ते १५० मेगावॅट विजेची आवश्यकता पडणार आहे. दोन्ही जिल्ह्यांना मिळून येत्या काळात २,८०० मेगावॅट विजेची आवश्यकता पडणार आहे. आजघडीला ४ हजार मेगावॅट वीजपुरवठा करण्याची क्षमता महापारेषण व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने प्राप्त केली आहे. केंद्र सरकारच्या पॉवर ग्रीडने वाळूज ते चित्तेपिंपळगावदरम्यान ५२ कि.मी.ची ७६५ बाय ४०० केव्हीची वाहिनी जोडणी केली आहे. २ ऐवजी ४ कंडक्टरची कॉडलाईन झाली आहे. चित्तेपिंपळगाव येथे ७६५ के.व्ही.चे उपकेंद्र तयार करण्यात आले आहे, तर महापारेषणच्या वाळूज येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रात ८ वाहिन्या आहेत. यापैकी २ वाहिन्या पुण्याला वीजपुरवठा करणार्या, तर ६ वाहिन्या औरंगाबादेत वीजपुरवठा करणार्या आहेत. चार वाहिन्या या प्रत्येकी ५०० मेगावॅट, तर २ वाहिन्यांची क्षमता १ हजार मेगावॅटने वाढणार आहे, अशी एकूण ४ हजार मेगावॅट विजेची क्षमता निर्माण झाली आहे. वर्षभरात एकतुनीतील उपकेंद्र कार्यान्वित होणार महापारेषणने अकोला ते थाप्पटीतांड्यापर्यंत (आडूळ परिसर) ७६५ के.व्ही.च्या वाहिनीचे जाळे निर्माण केले आहे. मात्र, जालना येथील एकतुनीत ७६५ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्यास सुरुवात झाली आहे. १ मार्च २०१५ पर्यंत उपकेंद्र कार्यान्वित होईल तेव्हा अकोल्याहून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या ७६५ के.व्ही.तून ४०० के.व्ही.वर वीजपुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद-जालन्याची भविष्यातील विजेची गरज भागविणार डीएमआयसी प्रकल्पामुळे औरंगाबाद परिसरात कायापालट होणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक उद्योग येथे येतील. त्याबरोबरच नवीन औद्योगिक तसेच रहिवासी वसाहती तयार होतील. याशिवाय कल्याण- डोंबिवली, पुणे- पिंपरी चिंचवड ही जुळी शहरे झाली याच धर्तीवर औरंगाबाद- जालना ही दोन्ही शहरे विकसित होत आहेत. या दोन्ही शहरांतील भविष्यातील मागणी लक्षात घेऊन महापारेषणने विद्युत वाहिन्या सक्षमीकरणाचे नियोजन केले आहे. याशिवाय जालन्यातील औद्योगिक वसाहतीचा विस्तार लक्षात घेता नागेवाडी येथे २२० के.व्ही.चे नवीन उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास म्हस्के यांनी दिली. मुंबई औद्योगिकनगरीला औरंगाबादची पॉवर एकतुनी व चित्तेपिंपळगाव या दोन उपकेंद्रांच्या माध्यमातून येत्या काळात औरंगाबादमार्गे पुणे, नाशिक व मुंबईजवळील कुडूस औद्योगिक वसाहतीला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. औरंगाबाद- जालन्याची गरज भागवून मेट्रोसिटीला हा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.