औरंगाबादेत हवी फर्निचरची उद्यमनगरी
By Admin | Updated: August 25, 2014 00:23 IST2014-08-25T00:16:26+5:302014-08-25T00:23:36+5:30
नजीर शेख,औरंगाबाद जागा असेल तेथे फर्निचर उद्यमनगरी निर्माण करायला हवी, असे मत शेख आसेफ यांनी मांडले.

औरंगाबादेत हवी फर्निचरची उद्यमनगरी
नजीर शेख,औरंगाबाद
आपल्या शहरातील व्यवसायाचा विचार केल्यास फर्निचर उद्योग हा आकार घेत असून आता शहरात किंवा शहर परिसरात जागा असेल तेथे फर्निचर उद्यमनगरी निर्माण करायला हवी, असे मत फर्निचर व्यावसायिक शेख आसेफ यांनी मांडले.
फर्निचर व्यवसायातील अनेक कुशल कारागीर आपल्या शहरात असल्याचे शेख आसेफ यांनी यावेळी सांगितले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात ते म्हणाले की, फर्निचर विक्री आणि फर्निचर उत्पादन या दोन्ही गोष्टी आपल्याकडे चालतात. विवाहानिमित्त लागणारे, आॅफिस फर्निचर, बेड, इंटेरिअर, खिडक्या, दरवाजे, शालेय फर्निचर, हॉस्पिटल फर्निचर, उद्योगांसाठी लागणारे पायलट बॉक्सेस आदींची शहरात विक्री आणि उत्पादन होते. यामध्ये स्टील आणि लाकडी (वूडन) असे दोन्ही प्रकार आहेत.
शहरात फर्निचरची सुमारे १५० दुकाने असून या सर्वांची मिळून वार्षिक उलाढाल ही सुमारे सत्तर कोटींच्या आसपास असावी. एवढा मोठा व्यवसाय या शहरात विस्तारला आहे.
गेल्या काही वर्षांत नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे, तसेच शहर आणि परिसरात नव्याने घरांची निर्मिती होत आहे. त्यामुळे नव्या घरांमध्ये नवे फर्निचर लागतेच त्यामुळे शहरात हा उद्योग वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी फर्निचर निर्मितीचे काम चालते. यामध्ये स्टीलचे फर्निचर हे छोट्या छोट्या कारखान्यांमध्ये तर लाकडी फर्निचर हे मिळेल त्या जागेत तयार केले जाते. या व्यवसायात अडीचशेच्या वर स्थानिक कारागीर आहेत.
शिवाय, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून घरी, बंगल्यांमध्ये जाऊन फर्निचर तयार करणारे कारागीर वेगळेच आहेत. यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते. या व्यवसायाचा हा पसारा असला तरी या व्यवसायाला म्हणून काहीच सवलती नाहीत. त्यामुळे केवळ फर्निचर व्यवसायासाठी औरंगाबादमध्ये उद्यमनगरी उभी राहिल्यास काही प्रमाणात सवलती मिळू शकतील व या व्यवसायाला उभारी मिळेल.
आपल्याकडे चीनमध्ये तयार होणारे फर्निचरही मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्याची किंमतही कमी असते. चीनमध्ये लघु उद्योजकांना सवलती आणि प्रोत्साहन आहे. आपल्याकडे तसा प्रकार नाही. यामुळे काही सवलती देऊन फर्निचर तयार करण्याच्या उद्योगाला चालना द्यायला हवी. आपल्याकडे लाकडी खुर्च्या, दरवाजे आणि सोफे तयार करणारे कुशल कारागीर आहेत.
याठिकाणचे फर्निचर संपूर्ण मराठवाड्यात, तसेच बाहेरही जाते. औरंगाबादच्या तयार केलेल्या वस्तू इतर ठिकाणीही पसंत पडत आहेत. त्यामुळे या उद्योगाचा येथे आणखी विस्तार होऊ शकतो.