अमरनाथमध्ये औरंगाबादचे दीड हजार यात्रेकरू; काही परतले
By Admin | Updated: July 12, 2017 00:48 IST2017-07-12T00:46:20+5:302017-07-12T00:48:39+5:30
औरंगाबाद : अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या यात्रेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात २३३० भाविकांनी नोंदणी केली होती

अमरनाथमध्ये औरंगाबादचे दीड हजार यात्रेकरू; काही परतले
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या यात्रेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात २३३० भाविकांनी नोंदणी केली होती. त्यातील पहिल्या टप्प्यातील यात्रेकरू शहरात परतले आहेत; पण सध्या अमरनाथच्या रस्त्यावर सुमारे दीड हजारयात्रेकरू असून, सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेमुळे घाबरलेले काही यात्रेकरू यात्रा अर्धवट सोडून औरंगाबादच्या दिशेने परत निघाले आहेत; परंतु अनेकांनी बाबा अमरनाथ बर्फानीचे दर्शन घेण्याचा निर्धार केला आहे.
अमरनाथ यात्रेस २९ जूनपासून सुरुवात झाली. ७ आॅगस्ट म्हणजे राखी पौर्णिमेपर्यंत (४० दिवस) ही यात्रा सुरूराहणार आहे. अमरनाथ देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे बँकेमार्फत यात्रेकरूंची नोंदणी करण्यात येते. शहरातील जम्मू-काश्मीर बँकेत यंदा २३३० यात्रेकरूंनी नोंदणी केली. यात बालटालमार्गे १२००, तर पहलगाममार्गे ११३० यात्रेकरूंनी अमरनाथला जाण्याचे पसंत केले. १०० पेक्षा अधिक यात्रेकरूंचा पहिला जथा अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन करून सुखरूप शहरात आला. दुसरा जथाही परतण्याच्या मार्गावर आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये औरंगाबाद, जालना, अहमदनगर आदी परिसरातील सुमारे दीड हजार भाविक आहेत. काही जण अमरनाथ दर्शन करून जम्मूला परतत आहेत, तर काही जण आता अमरनाथ यात्रेच्या वाटेवर आहेत. चेलीपुरा येथील जय भोले क्रीडा मंडळाचे मनोज संतान्से यांनी सांगितले की, मागील १८ वर्षांपासून आमच्या मंडळाचे सदस्य अमरनाथ यात्रेला जात आहे. यंदा ५ जुलैला १४ जण व ६ जुलै रोजी २० जण जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले. सोमवारी रात्री जेथे दहशतवादी हल्ला झाला तेथे औरंगाबादचे कोणी नव्हते. आम्ही सदस्यांशी संपर्क साधला. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली. आज दिवसभर आम्ही सदस्यांच्या संपर्कात होतो.