जिल्हा परिषद सीईओंचा दणका; कामात हलगर्जीपणामुळे कन्नड तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 14:32 IST2021-04-03T14:30:26+5:302021-04-03T14:32:52+5:30
Aurangabad Zilla Parishad CEOs strict action जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याने त्याचा त्रास रुग्ण व नातेवाईकांना होत आहे

जिल्हा परिषद सीईओंचा दणका; कामात हलगर्जीपणामुळे कन्नड तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला पदभार
औरंगाबाद : कन्नडमध्ये संसर्ग वाढत असताना मृत्यूदरही ३ टक्क्यांवर पोहोचला आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी दुपारी कन्नड गाठले. सुटीच्या दिवशी अचानक दिलेल्या भेटीत ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील असमन्वय समोर आला. कामातील दुर्लक्ष आणि हलगर्जीपणाबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण लांजेवार यांचा तत्काळ पदभार काढला. तर कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याने त्याचा त्रास रुग्ण व नातेवाईकांना होत असल्याचे डाॅ. गोंदावले यांच्यासमोर आल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण लांजेवार यांना तत्काळ पदभार काढून हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमंत गावंडे यांच्याकडे सोपवला. ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीत वैद्यकीय अधीक्षकांच्या डॉ. दत्ता देगावकरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून कारवाईची शिफारस करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गोंदावले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कामात हलगर्जीपणा सहन करणार नाही
कोरोनाचे संकट जिल्ह्यात वाढत असताना प्रत्येकाने दिलेल्या आदेशानुसार शिस्तीत काम करणे अपेक्षित आहे. अशाच सरप्राईज व्हिजिट देऊन कामकाजाची पडताळणी पुढील काळातही केली जाईल. कोरोनाला प्रतिबंध करणे, लसीकरण वाढवणे असंक्रमित गावे संक्रमणापासून वाचवण्याला यंत्रणेची प्राथमिकता असल्याचे सांगत कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- डॉ. मंगेश गोंदावले, सीईओ.