Aurangabad Violence : परवानगी नसतानाही शिवसेनेच्या पोलीसविरोधी मोर्चास सुरुवात ; पोलीस आयुक्तांचा इशारा डावलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:05 IST2018-05-19T12:28:13+5:302018-05-19T13:05:40+5:30
११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास सुरुवात झाली.

Aurangabad Violence : परवानगी नसतानाही शिवसेनेच्या पोलीसविरोधी मोर्चास सुरुवात ; पोलीस आयुक्तांचा इशारा डावलला
औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास पैठण गेट येथून सुरुवात झाली. विशेष म्हणजे या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून विनापरवानगी मोर्चा काढाल, तर गुन्हे नोंदवू आणि अटकेची कायदेशीर कारवाईही केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल दिला होता. या इशाऱ्याला डावलून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला आहे.
शहरातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवसेना कार्यकर्ता लच्छू पहिलवान यांना अटक केली. या अटकेनंतर शिवसेनेने पोलिसांची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आजचा मोर्चा आयोजिल केला आहे. आज सकाळपासूनच क्रांती चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते जमत होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना मोर्चा निघत असल्याने मोर्चा सुरु होण्यापूर्वी सेना पदाधिकाऱ्यांचा पोलिसांना सोबत वाद झाला. हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौक, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणार आहे.
परवानगी नाकारल्याचे दिले पत्र
मोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेकडून पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. याबाबतचे पत्र पोलिसांनी शिवसेनेला कालच दिले आहे .
एसआरपीचा बंदोबस्त
पोलिसांनी खबरदारी घेऊन विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले. राज्य राखीव दलाच्या सात कंपन्या, शहर पोलीस दलातील तीन उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिका-यांसह सुमारे अडीच हजार पोलीस तैनात आहेत. काही गडबड होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.
कायदा व सुव्यवस्थेमुळे नकार
११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीनंतर दोन समुदायांत तणाव आहे. पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करून निषेध मोर्चाचे आयोजन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यासोबतच त्यानंतरही शिवसेनेने मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले असून मोर्चा काढणे लोकशाहीत अधिकार आहे. तो अधिकार वापरा, घोषणा द्या, परंतु तणाव निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका, असे शिवसेनेच्या पदाधिका-यांना स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना शुक्रवारी सांगितले.