Aurangabad Violence : 'त्या' परिसरात दरवळला अत्तराचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:04 IST2018-05-14T12:58:40+5:302018-05-14T13:04:57+5:30
शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली.

Aurangabad Violence : 'त्या' परिसरात दरवळला अत्तराचा सुगंध
औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली. या इमारतीतून आगीचे निखारे सतत फुलत होते. यातही वाऱ्याची झुळक येताच सुगंधाची लहर येत होती. ही लहर येताच येणारे-जाणारे हळहळ व्यक्त करीत पुढे निघून जात होते.
कोणत्याही दंगलीला जात, धर्म नसतो. दंगलखोरी ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या तडाख्यातून विरोधकांसह स्वकीयही सुटत नसतात. हा नियम आहे. याच नियमाप्रमाणे राजाबाजारातील शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराशेजारी १०० वर्षे जुनी इमारत होती. ही इमारत शहरातील अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांतील मोठ्या घटनांची साक्षीदार आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर माजी नगराध्यक्ष कै. बजरंगलाल शर्मा यांचे कुटुंब राहत होते, तर तळमजल्यात म्हैसूर सुगंध भांडार, माय चॉईस अगरबत्ती ही दुकाने होती. या दोन्ही दुकानांत सुंगध देणाऱ्या वास्तूंची विक्री होत असे. यातील म्हैसूर सुगंध भांडारमधील अत्तर शहरात प्रसिद्ध होते.
अत्तराचे अनेक शौकीन नागरिक या ठिकाणाहून वेगवेगळ्या सुगंधी अत्तराची खरेदी करीत असत, तर माय चॉईस अगरबत्तीच्या दुकानातही वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती ठेवण्यात आलेल्या होत्या. दंगलखोरांनी ही इमारतच शुक्रवारी मध्यरात्री पेटवून दिली. या इमारतीचा बहुतांश भाग हा सागवान लाकडाचा असल्यामुळे आगीत तात्काळ कोसळला, तर अग्निशामक दलाच्या जवानांना पेटलेली लाकडे विझविण्यात यश आले होते. मात्र, इमारत कोसळल्यामुळे अत्तर, अगरबत्तीचे दुकान उद्ध्वस्त झाले.
शुक्रवारच्या मध्यरात्री पेटवलेल्या या इमारतीमधून रविवारीही वाऱ्याची झुळूक येताच निखारे उडत होते. या जळत्या निखाऱ्यातूनही सुगंधी लहर येत होती. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना हा सुगंध सुखावत होता. मात्र, या दुकानाकडे पाहताच उद्ध्वस्त झालेल्या इमारतीची जळालेली लाकडे, पत्रे दिसत होती.
गुण्यागोविंदाने नांदत होतो...
हिंदू-मुस्लिम असा दंगलीला धार्मिक रंग देण्यात येत आहे. माझ्या इमारतीमध्ये हिंदू, मुसलमान, शीख अशा सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपला व्यापार भला अन् आपण. सर्वजण एकमेकांच्या ताटात जेवण करतात. आमच्यात कधीही वाद झाले नाहीत. मात्र, दंगलीत हिंदू, मुस्लिम, शिखांची दुकाने पेटवली. या दंगलखोरांना कोणतीही जात, धर्म नव्हता, अशी भावनिक प्रतिक्रिया शहागंज कॉर्नरवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीमधील रहिवासी सतीश चव्हाण यांनी दिली.