Aurangabad Violence : उद्घाटनापूर्वीच स्वप्नांची राखरांगोळी; दुकानदार म्हणतात आत्महत्येशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:06 IST2018-05-14T18:00:20+5:302018-05-14T18:06:12+5:30
नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले.

Aurangabad Violence : उद्घाटनापूर्वीच स्वप्नांची राखरांगोळी; दुकानदार म्हणतात आत्महत्येशिवाय पर्याय नाही
औरंगाबाद : नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले. विशेष बाब म्हणजे रऊफ यांनी दुकानाचे उद्घाटनही केले नव्हते. रमजान महिन्यात उद्घाटनाचा विचार त्यांनी केला होता. दुकान सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. डोक्यावर लाखो रुपयांचे कर्ज असून, आपल्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.
कप्तान या पेन्ट दुकानाच्या बाजूलाच त्यांनी मोठ्या मुश्किलीने एक दुकान भाड्याने घेतले. दुकानाखालील एक गोडाऊनही घेतले. वेगवेगळ्या राज्यांतून इलेक्ट्रिकचे अत्यंत महागडे सामानही त्यांनी मागविले होते. व्यापाऱ्यांनी रऊफ यांच्यावर विश्वास टाकत लाखो रुपयांचा माल क्षणार्धात पाठवून दिला. मागील काही दिवसांपासून दुकानात सामान जमविण्याचे काम ते आपल्या नातेवाईकांसोबत करीत होते. शुक्रवारी मध्यरात्री समाजकंटकांनी त्यांच्याही दुकानाला लक्ष्य केले. लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाला वारंवार फोन करूनही पाण्याचा बंब आला नाही. सकाळी ६ वाजता अग्निशमन विभागाची गाडी आली. तोपर्यंत दुकानातील संपूर्ण सामान जळून खाक झाले होते.
दुकानातील एकही वस्तू वापरण्यासारखी नाही. दुकानच सुरू केले नसल्याने विमा काढण्याचा प्रश्नच नसल्याचे रऊफ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना नमूद केले. डोक्यावर आता लाखो रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज कधी फेडणार या चिंतेने माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे रऊफ यांनी सांगितले. आयुष्यात आपण कोणाचे वाईट केले नाही. आपल्यावरच ही वेळ का आली म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले...!