निलंबित ‘डीएचओ’ गीतेंचा प्रताप थांबेना; विनयभंग प्रकरणात झाली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:53 IST2020-07-13T13:53:06+5:302020-07-13T13:53:27+5:30
मोबाईलवर कॉल करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले व पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

निलंबित ‘डीएचओ’ गीतेंचा प्रताप थांबेना; विनयभंग प्रकरणात झाली अटक
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास फोन करून मनाला लज्जा वाटेल, असे शब्द वापरुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिडको पोलीसांनी डॉ. गितेला विनयभंगाच्या गुन्ह्यात आतक केली आहे.
यासंदर्भात कन्नड तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉ. गिते हे ९ जुलै रोजी रात्री ७.४५ ते ११.४० वाजेपर्यंत माझ्या मोबाईलवर सतत कॉल करीत होते; पण मी त्यांचा नंबर ब्लॉक केल्यामुळे त्यांचा कॉल उचलला नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या पतीच्या मोबाईलवर कॉल करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले व पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या शहरात लॉकडाऊन असल्यामुळे मी प्राथिमक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मुख्यालयात वास्तव्यास होते.
पतीकडून डॉ. गिते यांच्या या कृत्याची रात्रीच माहिती मिळाली. त्यानंतर गिते यांनी पुन्हा मला कॉल केला व तो उचलल्यानंतर त्यांनी लज्जा वाटेल, असे शब्द वापरत शिवीगाळ केली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी डॉ. गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.