औरंगाबादची मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढायला हवी
By Admin | Updated: June 7, 2014 00:55 IST2014-06-07T00:40:51+5:302014-06-07T00:55:17+5:30
औरंगाबाद : रेल्वेगाड्यांची अपुरी संख्या आणि बाराही महिने गर्दी यामुळे औरंगाबाद- मुंबईची कनेक्टिव्हिटी कमी पडत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

औरंगाबादची मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढायला हवी
औरंगाबाद : रेल्वेगाड्यांची अपुरी संख्या आणि बाराही महिने गर्दी यामुळे औरंगाबाद- मुंबईची कनेक्टिव्हिटी कमी पडत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादहून मुंबई आणि मुंबईहून औरंगाबादच्या प्रवासी व पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढायला पाहिजे. त्यासाठी नवीन रेल्वे, सध्याच्या रेल्वेगाड्यांच्या बोगीमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडे औरंगाबाद- मुंबई रेल्वे कनेक्टिव्हिटीत वाढ करण्याची मागणी प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून सतत करीत आहेत. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळ अजिंठा आणि वेरूळ ही जागतिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे मुंबईला भेट देणारे अनेक जण या स्थळांना भेट देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे औरंगाबाद- मुंबईसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी योग्य असणे गरजेचे होत आहे. सध्या मुंबईसाठी जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम आणि देवगिरी एक्स्प्रेस, तर आठवड्यातून एक दिवस धावणारी अजनी एक्स्प्रेस उपलब्ध आहे; परंतु मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येपुढे या गाड्यांचे आरक्षण कायम वेटिंगवर असल्याचा अनुभव प्रवाशांना येतो. त्यामुळे तिकीट मिळवूनसुद्धा उभे राहूनच मुंबईला जायची वेळ येत आहे. औरंगाबादहून थेट मुंबईला जाणारी जनशताब्दी ही एकमेव आहे. या गाडीच्या बोगी वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे; परंतु त्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
अजनी एक्स्प्रेस नियमित व्हावी
गाड्याच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांना उभे राहूनच मुंबईला जावे लागत आहे. त्यातसुद्धा होणाऱ्या प्रचंड दाटीमुळे प्रवाशांमध्ये वाद होतात. त्यामुळे अजनी एक्स्प्रेस नियमित झाल्यास मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल.
-संतोषकुमार सोमाणी,
अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना
नवीन रेल्वे आवश्यक
मुंबईच्या स्थानकांवर जागा कमी असल्याने बोगी वाढविणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे मुंबईसाठी नवीन रेल्वे आवश्यक आहे. नवीन रेल्वे मुंबईला सकाळी १० वाजता पोहोचणारी हवी. त्यामुळे प्रवाशांची अधिक सोय होईल.
-ओमप्रकाश वर्मा,
अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती