नाथसागराचा जलसाठा ८७ टक्क्यांवर; आवक सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:31 PM2019-08-12T14:31:43+5:302019-08-12T14:33:55+5:30

आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात १५९० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले.

In Aurangabad, Jayakwadi's Nathsagar reservoir at 87% | नाथसागराचा जलसाठा ८७ टक्क्यांवर; आवक सुरूच 

नाथसागराचा जलसाठा ८७ टक्क्यांवर; आवक सुरूच 

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाचा जलसाठा सोमवारी सकाळी १० वाजता ८७.२२ टक्के झाला. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरण समूहातून विसर्ग सुरू असल्याने नाथसागरात ५४५१५  क्युसेक अशी आवक सुरू होती. धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आता फक्त तीन फूट रिकामे आहे. 

सोमवारी दुपारी जलविद्युत प्रकल्पातून गोदावरी नदीवर असलेल्या आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात १५९० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले. यासोबतच डाव्या कालव्यातून परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी ४०० क्युसेकने आणि उजव्या कालव्यातून ८०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाचा जलसाठा ९५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतरच धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातील भंडारदरा धरणातून ५,७४४ क्युसेक, निळवंडे धरणातून १०,८२७ क्युसेक व मुळा धरणातून ५,००० क्युसेक  विसर्ग सुरू होते. यामुळे ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात ११,२८५ क्युसेक असा विसर्ग रविवारी होत होता. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून आज विसर्ग कमी करण्यात आला. दारणा २,५३८ क्युसेक, गंगापूर धरणातून १,८९५ क्युसेक, पालखेड धरणातून ५,३२७ क्युसेक असा विसर्ग करण्यात येत होता. या सर्व धरणांचे पाणी नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यात येते. या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात २९,५९४ असा विसर्ग होत होता.

नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आल्याने सोमवारी जायकवाडी धरणात येणारी आवक घटण्याची शक्यता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता १,५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५१८.७५ फूट एवढी झाली होती. म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ३.२५ फुटाने पाणीपातळीत वाढ होणे बाकी आहे. जायकवाडी धरणात एकूण जलसाठा २५४२.१४१ दलघमी (८९.७६ टीएमसी) इतका झाला असून, यापैकी १८०४.०३५ दलघमी (६३.७० टीएमसी) जिवंत जलसाठा आहे. 

चनकवाडीचे सर्व दरवाजे काढले 
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास धरणाखाली गोदावरी पात्रात २ कि.मी. अंतरावर असलेल्या चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढावे लागतात. १९९० ला हे दरवाजे काढण्यासाठी विलंब झाल्याने पैठण शहरावर पूरपरिस्थिती ओढावली होती. यामुळे या बंधाऱ्याचे दरवाजे काढण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. धरणातील जलसाठा लक्षात घेता शनिवारी रात्री काम न थांबविता सलग सुरू ठेवले. रविवारी सकाळी ७ वाजता सर्व ३८ दरवाजे काढण्याचे काम संपविण्यात आले. यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, धरण अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर. ई. चक्रे  यांनी सांगितले.
 

Web Title: In Aurangabad, Jayakwadi's Nathsagar reservoir at 87%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.