औरंगाबाद- नगर रस्त्यावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: June 16, 2014 01:08 IST2014-06-16T00:47:01+5:302014-06-16T01:08:58+5:30

वाळूज महानगर : औरंगाबाद- नगर रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Aurangabad- ignoring the encroachments on the city road | औरंगाबाद- नगर रस्त्यावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद- नगर रस्त्यावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

वाळूज महानगर : औरंगाबाद- नगर रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या रस्त्यावर ए.एस. क्लबपासून ढोरेगावपर्यंत अनेक व्यावसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केले आहे. गावातून जाणाऱ्या या रस्त्यावरील फूटपाथ गायब झाले असून त्या जागेचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे. नगर तसेच पुण्याकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. अतिक्रमणांबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तिरंगा चौक, जामा मशीद चौक, कामगार चौक, बजाजगेट, गरवारे गेट, थम्सअप कॉर्नर, लांझी रोड, शिवराई पथकर नाका, लिंबेजळगाव, दहेगाव बंगला, इसारवाडी फाटा, ढोरेगाव आदी ठिकाणी वाहनांचे अघोषित थांबे तयार झाले आहेत.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात कच्च्या व पक्क्या मालाची ने- आण करणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभी केली जातात.
यामुळे हा महामार्ग ठिकठिकाणी अरुंद बनल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यावरील या अवैध वाहनतळामुळे दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. हा महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात
आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जडवाहने तसेच व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून कब्जा केल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे, असे दीपक बडे, फिरोज पठाण, दीपक सदावर्ते, रवी मनगटे, सचिन काकडे, शेख मन्सूर, अनिल जाधव यांचे म्हणणे आहे.
जागतिक बँक प्रकल्प
हा महामार्ग जागतिक बँक प्रकल्पाच्या अखत्यारीत येत असून महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनही या वाढत्या अतिक्रमणांकडे कानाडोळा करीत आहे. रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणारे व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Aurangabad- ignoring the encroachments on the city road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.