पुरातत्व विभागाच्या 'मस्ट सी' यादीत औरंगाबादची ५ स्थळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 18:27 IST2019-12-21T18:26:22+5:302019-12-21T18:27:50+5:30
यादीत महाराष्ट्रातील एकूण १० ठिकाणे आहेत.

पुरातत्व विभागाच्या 'मस्ट सी' यादीत औरंगाबादची ५ स्थळे
औरंगाबाद : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी’ म्हणजे अवश्य बघावे, असे ऑनलाईन पोर्टल बनविले आहे. भारतात आल्यावर पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी, अशा १३८ पर्यटनस्थळांची यादी यामध्ये असून, यापैकी महाराष्ट्रातील एकूण १० ठिकाणे आहेत. यापैकी ५ ठिकाणे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत, ही औरंगाबादच्या पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पर्यटन व सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांनी या पोर्टलविषयी माहिती दिली. या स्मारकांच्या यादीमध्ये काही पुरातन साईटस् आहेत, तर काही ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी आहेत. १३८ ठिकाणांपैकी सर्वाधिक ३१ ठिकाणे कर्नाटक येथील, १३ ठिकाणे मध्यप्रदेशातील, तर १० ठिकाणे महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्रातील ठिकाणांमध्ये अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, दौलताबाद किल्ला, एलिफंटा केव्हज, वेरूळ लेणी, लोणार येथील मंदिरे, ग्वालीगृह किल्ला, पांडूलेणी आणि बीबी-का-मकबरा या स्थळांचा समावेश आहे. ५ ऐतिहासिक स्थळे असणारा या यादीतील औरंगाबाद हा एकमेव जिल्हा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच ऐतिहासिक वारसा दृष्टीने औरंगाबाद शहर किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.
पर्यटन व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील
औरंगाबादच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की, १३८ स्मारकांपैकी १० महाराष्ट्रात आहेत व त्यातही ५ औरंगाबादेत आहेत. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. यातूनच रोजगार निर्मिती होऊन आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होईल. पर्यटन व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील. पुरातत्व विभागाच्या या पोर्टलमुळे औरंगाबाद लेण्यांनाही नव्याने वाव मिळेल. यातून आपल्या राज्यासह विशेषत: औरंगाबाद शहराचे पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील महत्त्व सिद्ध होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास व उपाहारगृह औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ, फर्दापूर आणि राज्यभर असून, आम्ही पर्यटकांच्या सेवेत अहोरात्र उपलब्ध आहोत. पर्यटकांना विविध सेवा देताना आम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहोत.
- चंद्रशेखर जयस्वाल, उपमहाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई.