औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ निवृत्तावर पुन्हा मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:54 IST2018-01-24T23:54:30+5:302018-01-24T23:54:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास पुन्हा एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, असा निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. या निर्णयाला १४ महिने उलटण्याच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांना परीक्षा विभागात एकत्रित वेतनावर नियुक्ती देत, त्यांची नेमणूक नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या विभागात केली आहे.

औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ निवृत्तावर पुन्हा मेहरबान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास पुन्हा एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, असा निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. या निर्णयाला १४ महिने उलटण्याच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांना परीक्षा विभागात एकत्रित वेतनावर नियुक्ती देत, त्यांची नेमणूक नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या विभागात केली आहे.
विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुनश्च विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, जर संबंधित विभागप्रमुखांनी अशा प्रकारची नियुक्ती दिल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही. संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहील, अशा आशयाचे परिपत्रक तत्कालीन कुलसचिवांनी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी काढले होते. याविषयाचा धोरणात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतला असल्याचेही संबंधित आदेशात म्हटले होते. मात्र, यास बरोबर १४ महिने संपण्याच्या आतच सेवानिवृत्त झालेल्या ३ कर्मचाºयांना दोन दिवसांपूर्वी परीक्षा विभागात नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात आर. पी. वाघ, एस. पी. दाभाडे आणि के. के. पैठणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या नेमणुका वादग्रस्त ठरलेल्या अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात केल्या आहेत. मागील वर्षी १६ मेच्या मध्यरात्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तरपत्रिकाचे सील फोडून विद्यार्थ्यांना एका नगरसेवकाच्या घरी लिहिण्यास देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यात पोलिसांनी छापा मारत मोठे रॅकेट उघडकीस आणले. यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी १९ मे २०१७ रोजी परीक्षा संचालकांचा पदभार काढत अभियांत्रिकी विभागातील सर्वच कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यातून कोणीही सुटले नव्हते. यानंतर १ ते ३ जूनदरम्यान परीक्षा विभागासह इतर ठिकाणी ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या १२५ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाºयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. यास सहा महिने होण्याच्या आतच परीक्षा विभागातून बदल्या झालेले अधिकारी, कर्मचारी पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचले आहेत. अनेक वर्षांपासून परीक्षा विभागात काम करत असल्यामुळे त्यांची तेथील कामाची माहिती आहे. दुसºया कोणाची नियुक्ती केली, तर परीक्षा विभागाचे काम थांबेल, अशी भीती कुलगुरूंना दाखविण्यात येते. यामुळे एक-दोन अशा सतत बदल्या होत पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झालीे.
परीक्षा विभाग पूर्वपदावर
परीक्षा विभाग नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. ‘साई’ प्रकरणानंतर साफसफाई मोहीम राबविण्यात आली होती. नुकत्याच वसंतराव नाईक महाविद्यालयात एम.ए. व्यवस्थापनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकाºयांनी महाविद्यालय प्रशासनावर दबाव टाकल्याचे समोर आले होते. याचवेळी बदल्या झालेले सर्व कर्मचारी आणि आता सेवानिवृत्तही पुन्हा मूळ ठिकाणी आल्यामुळे सर्व काही पूर्वपदावर आले असल्याची चर्चाही दबक्या आवाजात विद्यापीठात सुरू आहे. नेमणूक केलेल्या तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांमधील एकाला १० तर दोघाला १५ हजार रुपये एकत्रित वेतन देण्यात येणार आहे.