औरंगाबाद जिल्ह्यात पथदिव्यांची दीडशे कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:10 IST2018-03-24T13:05:02+5:302018-03-24T13:10:38+5:30
औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात पथदिव्यांची दीडशे कोटींची थकबाकी
औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत. औरंगाबाद परिमंडळातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांची थकबाकी १४८ कोटी ४७ लाख रुपये एवढी आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे औरंगाबाद तालुक्यात ३१६ ग्राहक असून, त्यांच्याकडे १० कोटी ५८ लाख रुपये, पैठण तालुक्यात ३६७ ग्राहकांकडे ३७ कोटी ३० लाख रुपये थकबाकी आहे.गंगापूर तालुक्यात ३४९ वीज ग्राहकांकडे २२ कोटी ९२ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. खुलताबाद तालुक्यात १२७ वीज ग्राहकांकडे ०४ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. फुलंब्री तालुक्यात १०४ वीज ग्राहकांकडे ९ कोटी ५२ लाख रुपये, तर कन्नड तालुक्यात १८९ वीज ग्राहकांकडे १० कोटी २२ लाख रुपये थकबाकी आहे.वैजापूर तालुक्यात २४४ वीज ग्राहकांकडे १८ कोटी ९० लाख रुपये, सिल्लोड तालुक्यात २५२ वीज ग्राहकांकडे २४ कोटी ७१ लाख रुपये, सोयगाव तालुक्यात १२६ वीज ग्राहकांकडे ९ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे.
थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांचे २ हजार ७४ वीज ग्राहक असून, त्यांच्याकडे १४८ कोटी ४७ लाख एवढी थकबाकी आहे. ग्रामपंचायतींनी पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबाकी तात्काळ भरावी, अन्यथा प्रतिसाद न देणार्या ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.