औरंगाबाद जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:37 AM2020-01-04T03:37:54+5:302020-01-04T03:38:19+5:30

आज पुन्हा होणार फेरमतदान; एका मताच्या मोजणीवरून उडाला गोंधळ

Aurangabad Dist. W Presidential election process stopped | औरंगाबाद जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली

औरंगाबाद जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांची बंडखोरी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक ६ सदस्यांनी शिवसेनेच्या विरोधी पवित्रा घेतल्यामुळे शुक्रवारी राजकीय नाट्य घडले. एका मताच्या मोजणीवरून उडालेल्या गोंधळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियाच तहकूब केली. ही तहकूब सभा शनिवारी दुपारी २ वाजता पुन्हा घेऊ न, त्यात फेरमतदान घेण्यात येईल, अशी माहिती पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी भास्कर पालवे यांनी दिली.

सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपामध्ये अध्यक्षपद काँग्रेसला आणि उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय मुंबईत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला होता. यानुसार काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी मीना शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच वेळी शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांनीही अर्ज घेतला होता. परंतु शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी त्यांचा अर्ज फाडून टाकला. त्यामुळे देवयानी यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली. तेव्हाच अ‍ॅड. डोणगावकर बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट झाले.

मीना शेळके, भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि शिवसेना बंडखोर अ‍ॅड. डोणगावकर यांनी उमेदवारी दाखल केली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शुभांगी काजे, भाजपकडून लहुजी गायकवाड आणि राज्यमंत्री सत्तार समर्थक काँग्रेसचे बंडखोर किशोर बलांडे यांनी उमेदवारी दाखल केली. शिवसेनेच्या बंडखोर अ‍ॅड. डोणगावकर यांनी राज्यमंत्री सत्तार समर्थक ६ सदस्यांना सोबत घेतले. त्याच वेळी भाजपशी संधान साधून अध्यक्षपदाला पाठिंबा दिल्यास उपाध्यक्षपदासाठी भाजपला मदत करण्याचे ठरले.

यानुसार प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाल्यानंतर अ‍ॅड. डोणगावकर यांनी बंडखोरी कायम ठेवली. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांचाही अर्ज कायम होता. मात्र भाजपच्या सर्वच सदस्यांनी अ‍ॅड. डोणगावकर यांना समर्थन दिले. हात उंचावून मतदान करताना शिवसेनेच्या सदस्य मोनाली राजेंद्र राठोड यांनी मीना शेळके यांच्या बाजूने हात उंचावला. मात्र त्यानंतर त्यांनी सही करताना नकार दिला, अशी चर्चा आहे.
यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. अनेक सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन गोंधळ घातला. मोनाली राठोड यांचे मत मीना शेळके यांच्या बाजूने धरण्याची मागणी केली.

जळगाव जि़ प़ भाजपने राखली
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य फोडत भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राखली़ ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना पाटील यांची अध्यक्षपदी तर नशिराबाद भादली गटाचे लालचंद पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली़
अध्यक्ष निवडीत रंजना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रेखा राजपूत यांचा तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत लालचंद पाटील यांनी जयश्री पाटील यांचा अनुक्रमे तीन-तीन मतांनी पराभव केला़ भाजपच्या उमेदवारांना ३४ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ३१ मते मिळाली़

Web Title: Aurangabad Dist. W Presidential election process stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.