लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा ऐतिहासिक अनुभव शहरवासीयांनी घेतला. बस जाळण्याची किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरावासीयांनी शांततेत अभूतपूर्व बंद पाळला. शहर प्रथमच १० तास कडकडीत बंद होते. जालना रोडसारखा वर्दळीचा रस्ताही पहिल्यांदाच बंद राहिल्याचे पाहावयास मिळाले. टीव्ही सेंटर ते देवळाई चौक, नगर नाका ते चिकलठाणा आणि ज्युबिलीपार्क ते मयूरपार्कपर्यंत सर्व व्यवहार ठप्प होते. शहरातील मराठा समाजबांधव मुलाबाळांसह रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करीत होते. आंदोलकांनी विविध रस्त्यांवर दगड, लाकडी ओंडके आणि जलवाहिनीचे लोखंडी पाईप टाकून रस्ता बंद केला, तर काही ठिकाणी पोलिसांच्या बॅरिकेड्सचा वापर आंदोलकांनी रस्ता अडविण्यासाठी केला. आंदोलनामुळे तीन रेल्वेगाड्या रोखल्या गेल्या. ‘जय भवानी, जय शिवराय’च्या जयघोषासोबत ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘फडणवीस सरकार मुर्दाबाद’, यासह अनेक घोषणा प्रत्येक चौकात ऐकायला मिळत होत्या.महावीर चौक येथून शहरात प्रवेश घेण्यासाठी जालना रोडवरून यावे लागते. डाव्या बाजूला रेल्वेस्टेशन तर उजव्या बाजूला मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा मार्ग आहे. बंदमुळे एस.टी. रस्त्यावर नव्हत्या, तर रेल्वेस्थानकाकडून येणारी वाहतूकही बंद होती. पुढे क्रांतीनगर, अदालत रोड सिग्नल, समर्थनगरकडे जाणाऱ्या मार्गावर शुकशुकाट होता. क्रांतीचौक तर मराठा क्रांती मोर्चाने दुमदुमून गेला होता. त्यामुळे समर्थनगरपासून त्या चौकाकडे पोलिसांनी जाऊ दिले नाही. क्रांतीचौकातून पैठणगेटकडे जाणारा आणि बन्सीलालनगरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. दुचाकींशिवाय कुठलेही वाहन त्या रस्त्यावरून क्रांतीचौकाकडे येत नव्हते.अमरप्रीत चौक बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आला होता. तेथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या दिला होता. अजबनगरमार्गे वाहतूक सुरू होती. मोंढानाका येथून जाफरगेट आणि शिवशंकर कॉलनी, बालाजीनगरकडे जाणारी दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. आकाशवाणी चौकात आंदोलकांनी ठिय्या देत रस्ता बंद केला होता. जवाहर कॉलनी व कैलासनगरकडे जाणारी वाहतूक यामुळे बंद होती. सेव्हन हिल येथे पोलिसांनी बॅरिकेटस् लावले होते. येथून तर दुचाकी वाहनांना देखील आंदोलकांनी जाऊ दिले नाही. एमजीएममार्गे सेंट्रल नाका ते गजानन मंदिर ते सूतगिरणीपर्यंत रस्ता बंद होता. वसंतराव नाईक चौक येथही रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे जयभवानीनगर आणि सिडको-हडकोकडे जाणारी वाहतूक बंद होती. मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात रस्ता बंद करण्यात आला होता. चिकलठाणा येथेही मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या केले.दुचाकींविना वाहन दिसलेच नाहीशहरातील रस्त्यांवर दुचाकींशिवाय दुसरे वाहन दिवभर दिसले नाही. चारचाकी वाहनांनादेखील अंतर्गत गल्ल्यांतून मार्ग शोधत जावे लागले. ज्यांना अंतर्गत रस्ते माहिती नव्हते, त्यांनी जालना रोडवरून राँगसाईड वाहने चालविली. ११५ वॉर्डांना एकमेकांशी जोडणाºया बहुतांश रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी होती. एक मराठा, लाख मराठा या घोषणेने शहरातील प्रत्येक चौक दुमदुमून गेला होता.
औरंगाबाद शहराने अनुभवला ऐतिहासिक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:15 IST
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा ऐतिहासिक अनुभव शहरवासीयांनी घेतला. बस जाळण्याची किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरावासीयांनी शांततेत अभूतपूर्व बंद पाळला. शहर प्रथमच १० तास कडकडीत बंद होते.
औरंगाबाद शहराने अनुभवला ऐतिहासिक बंद
ठळक मुद्देशहर ठप्प; बंद शांततेत : टीव्ही सेंटर ते देवळाई चौक, नगर नाका ते चिकलठाणा आणि ज्युबिलीपार्क ते मयूरपार्कपर्यंत सर्व व्यवहार ठप्प