औरंगाबादेतही हवी मेट्रो रेल्वे
By Admin | Updated: August 22, 2014 00:21 IST2014-08-21T23:59:24+5:302014-08-22T00:21:39+5:30
नजीर शेख, औरंगाबाद सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी औरंगाबादमध्येही मेट्रो रेल्वे हवी,

औरंगाबादेतही हवी मेट्रो रेल्वे
नजीर शेख, औरंगाबाद
गेल्या काही वर्षांतील सार्वजनिक वाहतुकीची आपल्या शहरातील व्यवस्था पाहिल्यास त्यात मोठी सुधारणा झाल्याचे दिसत नाही. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी औरंगाबादमध्येही मेट्रो रेल्वे हवी, असे मत औरंगाबादेतील प्रसिद्ध विकासक पापालाल गोयल आणि प्रसिद्ध विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी मांडले.
‘माझ्या शहरात काय हवे? ’ या विषयासंदर्भात दोन भिन्न क्षेत्रातील या तज्ज्ञांनी मेट्रो रेल्वे हवीच, असे मत मांडले. येत्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेची आतापासूनच तयारी करायला हवी, असे मत गोयल आणि देशमुख यांनी मांडले.
गोयल म्हणाले की, आपल्या असे ऐकिवात आहे की, वाळूजमध्ये आलेल्या एक-दोन उद्योजकांना खराब रस्ते आणि वाहतुकीच्या समस्येमुळे चिकलठाणा विमानतळ वेळेवर गाठणे शक्य झाले नाही आणि त्यांचे विमान चुकले. ही नुसती चर्चा जरी असली तरी यातून शहरातील वाहतूक व्यवस्थेची परिस्थिती आपल्यासमोर येते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यासाठी आता औरंगाबादेत मेट्रो रेल्वे सेवा असायला हवी. मी शांघायला गेलो असताना तेथे आम्ही २४ कि. मी. चे अंतर १२ ते १३ मिनिटांत कापले. चीनमध्ये रस्ते वाहतुकीत अडथळा आल्यामुळे कुणाची ‘फ्लाईट’ मिस होत नाही. सर्व टाईम टू टाईम. आपल्याकडे रस्त्यावरून वाहन चालवायचे म्हणजे अंगावर काटा येतो. त्यासाठी मेट्रो रेल्वे असायला हवी आणि त्याची मागणी आतापासूनच करायला हवी.
अॅड. देशमुख म्हणाले की, मागील चार- पाच वर्षांपासून औद्योगिक विकासाची गती वाढली आहे. सध्या शहराची लोकसंख्या १४ लाख आहे. येत्या काही वर्षांत शहर परिसरात ३० कि. मी. पर्यंत विस्तार होणार आहे.
किमान ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहराची गरज भागविणाऱ्या सुविधा शहरात असायला हव्यात. या शहरात गरीब तसेच मध्यमवर्गीयांना परवडेल अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. शहर बसही तोकडी आहे.
महापालिकेची स्थापना होऊन रौप्यमहोत्सव झाला तरी शहर बसबाबत महापालिकेला खंत ना खेद. या पार्श्वभूमीवर शहरात मेट्रो रेल्वे हवी. राज्य शासनाने पुणे आणि नागपूर या दोन शहरांच्या मेट्रो रेल्वेसाठी प्रस्ताव पाठविले होते.
यावेळी औरंगाबादचा मात्र विसर पडलेला दिसतो. नागपूर कराराप्रमाणे जे जे विदर्भाला द्याल ते ते मराठवाड्याला मिळालेच पाहिजे, याचा विसर मुख्यमंत्र्यांना का पडला. औरंगाबाद शहर आणि परिसर जोडण्यासाठी आणि जनसामान्यांना परवडेल अशा दरात वाहतुकीची व्यवस्था व्हावी, यादृष्टीने आतापासूनच नियोजन हवे.
शहराच्या विकास आराखड्याचे पुनर्विलोकन येत्या वर्षभरात होणार आहे. शिवाय प्रादेशिक विकास योजनादेखील मंजूर झाली आहे. झालर क्षेत्राच्या विकासाचा आराखडाही लवकरच मंजूर होईल. याच टप्प्यावर मेट्रो रेल्वेचे नियोजन हा विकास आराखड्याच्या पुनर्विलोकनाचा एक भाग म्हणून होणे आवश्यक आहे.