आरक्षण सोडतीनंतर विशेष ग्रामसभेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:21+5:302021-02-05T04:08:21+5:30
सोयगाव : तालुक्यात ४० ग्रामपंचायतींपैकी ३६ ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या, तर ४ ठिकाणी बिनविरोध निवड झाली. निकाल लागल्यानंतर आता शुक्रवारी ...

आरक्षण सोडतीनंतर विशेष ग्रामसभेकडे लक्ष
सोयगाव : तालुक्यात ४० ग्रामपंचायतींपैकी ३६ ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या, तर ४ ठिकाणी बिनविरोध निवड झाली. निकाल लागल्यानंतर आता शुक्रवारी (दि. २९) सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, त्यामुळे सोयगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील चाळीस आणि निवडणुका बाकी असलेल्या सहा, मिळून ४६ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत होणार आहे, असे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुळात तालुक्यात ३६ ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष निवडणूक झाली, तर चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तसेच दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सहा ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून त्यांचीदेखील सरपंच पदाची आरक्षण सोडत केली जाणार आहे. आरक्षण सोडत होताच गावा-गावात विशेष सभा घेऊन सरपंच विराजमान होणार आहे.
आरक्षण सोडत जाहीर होण्याच्या आधीच काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांना पॅनेल प्रमुखांनी सहलीवर घेऊन गेले आहेत. काही पॅनेल प्रमुख मात्र बिनधास्त आहेत. सरपंच सोडत जाहीर होताच विशेष सभांच्या मुहूर्तापर्यंत काही सदस्यांना सहलीवर घेऊन जाण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे सदस्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यात ३६८ सदस्यसंख्या आहे. त्यापैकी निम्म्या ग्रामपंचायतींना काठावर बहुमत प्राप्त झालेले आहेत. चार बिनविरोध झालेल्या आहेत. ग्रामपंचायतींचे सदस्य मात्र बिनधास्त गावात वावरत आहेत.