वाहन पकडल्याने तहसील परिसरात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST2017-07-19T00:13:38+5:302017-07-19T00:33:28+5:30
औंढा नागनाथ : गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची जप्तीची कारवाई टाळण्यासाठी वाहनमालकाने तहसीलच्या शासकीय निवासस्थान परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना

वाहन पकडल्याने तहसील परिसरात आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची जप्तीची कारवाई टाळण्यासाठी वाहनमालकाने तहसीलच्या शासकीय निवासस्थान परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. त्या माथेफिरूवर पोलीस कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिले आहेत.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या या वाहनमालकाचे नाव नवनाथ बापूराव चकोर (३५, रा.माटेगाव ता.वसमत) असे आहे. त्यांचे वाहन क्र.एम.एच.०४ -ईएल-७५५० हे वाहन महसूल विभागाने २६ मे रोजी पकडले होते. त्यानंतर त्याने ३१ मे रोजी दंडाची रक्कम भरली होती. हे वाहन सोडून देण्याचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालय वसमत यांच्याकडे पाठविला असता सदरील मालकाने नियमाचा भंग केल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्या वाहनाचा मूल्य निर्धारण प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला. त्यांनी वाहनाचे ६ लाख ५ हजार रुपये एवढे मूल्य काढले होते. ही रक्कम वाहन मालकाला भरण्याच्या लेखी सूचना देऊनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महसूल विभागाने २१ जून रोजी सदरील जप्त वाहनाचा लिलाव करण्याचा निर्णय घेऊन त्याला लेखी नोटीस दिली होती; परंतु ती घेण्यास नकार दिला असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया टाळण्यासाठी नवनाथ चकोर यांनी तहसील परिसर गाठले व शासकीय निवासस्थाने असलेल्या एका लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तलाठी वैजनाथ मुंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ चकोर यांना तहसीलदार यांच्या कार्यालयात नेले तेथे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी त्याची विचारपूस केली असता, माझ्याकडे एवढी रक्कम भरण्यासाठी नसल्याने हा प्रकार केल्याचे त्याने
सांगितला. दरम्यान, तहसीलदार माचेवाड यांनी चकोर याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आदेश पोलिसांना दिल्याने पोलिसांनी चकोर यास ताब्यात घेतले. उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.