जेवळीत दोन बँका लुटण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: August 21, 2014 01:20 IST2014-08-21T01:11:51+5:302014-08-21T01:20:45+5:30
जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दोन बँका लुटण्याचा चोरट्याचा डाव फसला. त्यामुळे बँकेचे लाखो रुपये वाचले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

जेवळीत दोन बँका लुटण्याचा प्रयत्न फसला
जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दोन बँका लुटण्याचा चोरट्याचा डाव फसला. त्यामुळे बँकेचे लाखो रुपये वाचले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
जेवळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. या दोन्ही बँका जवळपास असून, दोन्ही बँकेत सुरक्षा अधिकारी नाहीत. मंगळवारी जेवळीचा आठवडी बाजार असतो. त्यामुळे बँकेत दिवसभर ग्राहकांची गर्दी होती. जेवळी गावासह या परिसरातील १४ गावाचा कारभार महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे. त्यामुळे या बँकेचा मोठा आर्थिक व्यवहार चालतो. बँकेच्या आवारात वीज नाही व बँकेत सीसीटीव्ही कॅमेरा न बसविल्याने त्याचा फायदा चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री १२ ते ३ च्या सुमारास चॅनल गेट व लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. परंतु प्रयत्न करुनही तिजोरी फुटली नाही म्हणून चोरट्यांनी पूर्ण तिजोरीच घेवून जाण्याचा प्रयत्न केला. त्या तिजोरीच्या आजूबाजूच्या बांधकामही फोडले गेले. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे बँकेतील १२ लाख ८३ हजार ९८० रुपये बँकेच्या तिजोरीत सलामत राहिले. त्यानंतर चोरट्यांनी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या शटरचे लॉक तोडून या बँकेत हाती काय लागते का ते पाहिले.
त्याठिकाणी कपाट तोडून, ड्रावर व इतर साहित्याची मोडतोड केली व तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणीही हा प्रयत्न अयशस्वी झाला. ही घटना सकाळी ग्रामस्थांच्या नजरेसमोर आली. त्यानंतर लोहारा पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक शाहुराज भिमाळे, बीट अंमलदार उंबरे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी यु.डी. जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)