प्रशासनाला टार्गेट करण्याचा मग्रारोहयो ‘लॉबी’चा प्रयत्न
By Admin | Updated: November 29, 2015 23:16 IST2015-11-29T23:07:48+5:302015-11-29T23:16:02+5:30
उन्मेष पाटील , कळंब कळंब : तालुक्यातील काही गावांत शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याप्रसंगी झालेल्या वाद-विवादाचे पडसाद आगामी काळात प्रशासनस्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाला टार्गेट करण्याचा मग्रारोहयो ‘लॉबी’चा प्रयत्न
उन्मेष पाटील , कळंब
कळंब : तालुक्यातील काही गावांत शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याप्रसंगी झालेल्या वाद-विवादाचे पडसाद आगामी काळात प्रशासनस्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत. तालुक्यात मग्रारोहयो कामांच्या बोगसगिरीवर प्रशासनाने चाप लावल्याने अवस्थ झालेल्या मग्रारोहयो लॉबीने प्रशासनालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, मस्सा (खं) आदी ठिकाणी भेटी दिल्या. या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी सहभागी होते. तालुक्यामध्ये झालेली विविध कामे तसेच दुष्काळी परिस्थिती असताना कोणत्या उपाययोजना प्रशासनस्तरावर राबवायला हव्यात, नागरिकांचे काय म्हणणे आहे, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदींचा आढावा या दौऱ्यात घेण्यात आला. परंतु, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना माहिती घेऊ न देता प्रत्येक ठिकाणी गावपुढाऱ्यांनीच गराडा घातल्याचे चित्र दिसले. गावातील पाणीटंचाई, दुष्काळी मदत, शेतातील उभ्या पिकांचे पंचनामे या बाबींवर चर्चा करण्यापेक्षा गावपुढाऱ्यांनी मग्रारोहयोवरूनच अधिकाऱ्यांना जाब विचारले. यासाठी मजुरांचा घोळकाही जमा करण्यात अला होता. मजुरांच्या हाताला काम द्या, असाच रेटा काही गावपुढाऱ्यांनी लावून धरल्याने मजुरांपेक्षा पुढाऱ्यांनाच कामाची चिंता असल्याची चर्चाही उपस्थित अधिकाऱ्यांत होती.
मग्रारोहयो लॉबी अस्वस्थ
तालुक्यात मग्रारोहयोच्या नावाखाली लाखो रुपयांची खाबुगिरी करण्यात आली. या खाबुगिरीच्या अनेक प्रकरणांच्या चौकशा जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील मग्रारोहयो कामे ठप्प झाली आहेत.
परिणामी मग्रारोहयो लॉबीचे कुरणही बंद पडले आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या लॉबीने थेट प्रशासनालाच टार्गेट केल्याचे चित्र दिसून येत आहे.
मग्रारोहयो कामांवरून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. तालुक्यातील मग्रारोहयो कामांचे वास्तविक चित्र जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या कामांवरून प्रशासनस्तरावर दबाव आणू पाहणाऱ्या पुढाऱ्यांना ते कसे प्रत्युत्तर देतात, याबाबतही उत्सुकता आहे. तालुक्यात सर्वाधिक मग्रारोहयोची कामे झालेल्या गावांतील कामांची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा सुरू होवू शकते, असेही आता सांगण्यात येत आहे. यामुळे या गावांमधील कामांमध्ये बोगसगिरी झाल्याचे दिसून आले. तर जिल्हाधिकारी यातील जबाबदार मंडळींवर कडक कारवाई करू शकतात, अशीची शक्यता वर्तविली जात आहे.