बँकेला ५ लाखांचा चुना लावण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 16, 2014 01:11 IST2014-06-16T00:54:53+5:302014-06-16T01:11:08+5:30
औरंगाबाद : आयुर्विमा महामंडळाच्या झारखंड शाखेचा ५ लाख रुपयांचा धनादेश औरंगाबादेतील बँकेतून वटविणारा कोलकात्याचा भामटा फरार झाला आहे.

बँकेला ५ लाखांचा चुना लावण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : आयुर्विमा महामंडळाच्या झारखंड शाखेचा ५ लाख रुपयांचा धनादेश औरंगाबादेतील बँकेतून वटविणारा कोलकात्याचा भामटा फरार झाला आहे. दरम्यान, सिडको पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून बँक खाते गोठवल्यामुळे ते पैसे थोडक्यात वाचले.
त्याचे झाले असे की, कोलकाता येथील काली घाटी येथील रहिवासी सुरोजी दत्ता (३५) या भामट्याने झारखंड आयुर्विमा महामंडाळाचा ५ लाख रुपयांचा बनावट धनादेश तयार केला. त्याचे कोलकाता येथे इंडस्-इंड बँकेत खाते आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाचा तो ५ लाख रुपयांचा बनावट धनादेश तेथे न वटवता सुरोजी दत्ता याने औरंगाबादेत येऊन येथील इंडस्-इंड बँकेत वटवण्यासाठी टाकला. त्यानुसार २९ जुलै ते १६ आॅगस्ट २०१३ दरम्यान सुरोजी दत्ता याच्या खात्यात ४ लाख ९८ हजार ५५५ रुपये जमा झाले.
सिडको कॅनॉट परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या रिजनल आॅफिसमधून विनाव्यत्यय तो धनादेश क्लिअरन्स झाल्यानंतर काही दिवसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी झारखंड आयुर्विमा महामंडळाच्या शाखेकडे धनादेशाबाबत विचारणा केली. तेव्हा सुरोजी दत्ता या व्यक्तीला कोणताही धनादेश आमच्या शाखेने दिलेला नसल्याचे आयुर्विमा महामंडळाच्या झारखंड शाखेकडून उत्तर मिळाले. ते ऐकून येथील बँक अधिकारी चक्रावून गेले. त्यांनी २७ सप्टेंबर २०१३ रोजी सिडको ठाण्यात धाव घेऊन सुरोजी दत्ता या भामट्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
सिडको पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून सुरोजी दत्ता याचे कोलकाता येथील इंडस्- इंडमधील बँक खाते गोठविले. उपनिरीक्षक हरीश खटावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ जून रोजी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांची परवानगी घेऊन कोलकाता गाठले. तेथे काली घाटी पोलिसांच्या मदतीने सुरोजी दत्ता याच्या घरावर छापा मारला. तेव्हा तो बऱ्याच दिवसांपासून घर सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोलकाता येथे गेलेले पोलीस काल परतले असून ते त्याचा शोध घेत आहेत.