बेरोजगार तरुणांना फसवण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: July 27, 2016 00:50 IST2016-07-27T00:21:55+5:302016-07-27T00:50:27+5:30
औरंगाबाद : आपण नोकरीच्या शोधात आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही ‘इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स’मध्ये जवान पदासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला लेखी परीक्षा,

बेरोजगार तरुणांना फसवण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : आपण नोकरीच्या शोधात आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही ‘इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स’मध्ये जवान पदासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला लेखी परीक्षा, शारीरिक तसेच वैद्यकीय चाचणीशिवाय अलीकडे नियुक्तीपत्र मिळाले असेल, तर सावधान... तुमची फसवणूक होतेय. छावणी पोलीस ठाण्यात आज मंगळवारी उधमपूर येथील एका भामट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या नंदनवन कॉलनी येथील निखिलकुमार वीरेंद्रसिंग यादव या तरुणाला काल ‘इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स’मध्ये जवान पदाचे नियुक्तीपत्र टपालाने मिळाले. नियुक्तीपत्र मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत बँकेत ३६ हजार ७५० रुपये भरण्याची सूचना आहे. पैसे कोणत्या माध्यमातून पाठवायचे, यासाठी नियुक्तीपत्रावर एक मोबाईल क्रमांकही देण्यात आलेला आहे.
निखिल यादव याने शहरातील एका प्रसिद्ध झेरॉक्स सेंटर येथून संरक्षण मंत्रालयांतर्गत ‘इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स’मध्ये जवानपदाच्या नोकरीचा अर्ज घेतला. तो सविस्तर भरून पाठविल्यानंतर काल त्याला थेट नियुक्तीपत्रच मिळाले. थोडावेळ त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. मग, दोन-तीनवेळा त्याने ते नियुक्तीपत्र वाचले आणि पैशाची जमवाजमव सुरू केली. निखिलचे काका तथा शिवसेनेचे कार्यकर्ते अजय यादव यांच्याकडे त्याने नोकरीसाठी पैशाची मागणी करत ते नियुक्तीपत्र दाखविले. सामाजिक कार्यकर्ता अजय यादव यांनीही ते नियुक्तीपत्र दोन-तीनवेळा बारकाईने वाचले आणि त्या मोबाईल क्रमांकावर पैसे कसे पाठवायचे, अशी विचारणा केली. तेव्हा भारतीय स्टेट बँकेत पैसे जमा करावे लागतील, असे सांगून थोड्या वेळाने खाते क्रमांक सांगतो, असे म्हणून फोन लगेच बंद केला.
काही वेळानंतर अजय यादव यांनी तो मोबाईल क्रमांक ‘ट्रू कॉलर’ या अॅपवर सर्च केला, तर तो क्रमांक डॅनी खान, दिल्ली या नावाने दाखविण्यात आला. तेव्हा आपली फसवणूक होतेय, याची खात्री यादव कुटुंबियाला झाली. त्यांनी आणखी त्याच मोबाईलवर कॉल केला तेव्हा या प्रकरणी कोणाशी चर्चा न करता तात्काळ पैसे भरा अन्यथा नोकरी मिळणार नाही, असे सांगून पुन्हा फोन कट केला. त्यानंतर अजय यादव यांनी छावणी ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.