अल्पवयीन मुलीला धमकी देऊन अत्याचार
By Admin | Updated: June 27, 2016 01:03 IST2016-06-27T00:38:24+5:302016-06-27T01:03:48+5:30
औरंगाबाद : ओळखीच्याच तरुणाने १७ वर्षीय युवतीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या नराधमाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीला धमकी देऊन अत्याचार
औरंगाबाद : ओळखीच्याच तरुणाने १७ वर्षीय युवतीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या नराधमाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याच्या शोधात आहेत.
योगेश डोळस (रा. शिवाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, १७ वर्षीय पीडिता ही शहरातील एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. शिवाजीनगर परिसरात आईसोबत ती राहते. तिची आई कामानिमित्त २२ जून रोजी मुंबईला गेली होती. त्यामुळे तीन दिवसापासून पीडिता घरी एकटीच होती. योगेश हा पीडिता आणि तिच्या आईच्या ओळखीचा आहे.
मुलीची आई गावाला गेलेली असल्याची माहिती योगेशला समजली. रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी झोपलेली असताना योगेशने तिच्या घराचे दार वाजवले. एवढ्या रात्री कोण आले म्हणून मुलीने विचारले असता योगेशने स्वत:चे नाव सांगितले आणि तिच्याशी महत्त्वाचे बोलण्यासाठी आल्याचे सांगितले. ओळखीचाच असल्याने पीडितेने दरवाजा उघडला. योगेश घरात घुसला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्याने रडायला सुरुवात केली व आरडाओरड केल्यास तुझीच बदनामी होईल, शिवाय मीही तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पीडितेची आई मुंबईहून घरी परतली. त्यावेळी तिने दरवाजा उघडण्यासाठी आवाज देताच योगेश घरातून बाहेर पडताना दिसला. मुलीच्या आईने त्याचा हात पकडला असता हाताला झटका देऊन तो पळून गेला. योगेशने बदनामी करण्याची धमकी देत आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने तिच्या आईला सांगितले.
तिच्या मातेने पीडितेला सोबत घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, महिला फौजदार मनीषा लाड तपास करीत आहेत. पोलिसांनी योगेशचा शोध सुरू केला आहे.