व्हिडिओकॉनच्या चार व्यवस्थापकांविरुद्ध अॅट्रॉसिटी
By Admin | Updated: July 22, 2014 00:48 IST2014-07-22T00:40:05+5:302014-07-22T00:48:44+5:30
औरंगाबाद : व्हिडिओकॉन कंपनीचे चार व्यवस्थापक व बिडकीन पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह सहा जणांविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हिडिओकॉनच्या चार व्यवस्थापकांविरुद्ध अॅट्रॉसिटी
औरंगाबाद : व्हिडिओकॉन कंपनीचे चार व्यवस्थापक व बिडकीन पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह सहा जणांविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पैठण न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये शैलेंद्र कृष्णकुमार दुबे, अजय बाबूराव पांडे, आदित्य कृष्णकुमार सोमाणी, प्रशांत रामराव केदारे या चार कंपनी व्यवस्थापकांसह पोलीस निरीक्षक रवींद्र पुरुषोत्तम देहेडकर व हबीब मॅक्स नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे.
याबाबत माहिती देताना अॅड. अरुण शेजवळ यांनी सांगितले की, फिर्यादी गजानन खंदारे हे व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारात असलेल्या आॅटो कार्समध्ये नोकरीला आहेत. खंदारे हे कंपनी युनियनचे अध्यक्षही आहेत. खंदारे आपल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी कंपनीच्या या व्यवस्थापनाकडे गेल्यानंतर वरील चारही व्यवस्थापक त्यांना जातीवाचक शिवीगाळ करीत, टोमणे मारत होते. असे प्रकार अनेकदा घडले. आरोपी कंपनीशी संबंधित असलेला हबीब मॅक्स हासुद्धा वरील व्यवस्थापकांच्या सांगण्यावरून खंदारे यांना धमकावीत असे. काही दिवसांपूर्वी एका कामगाराचे पैसे देण्यावरून वाद झाला. व्यवस्थापकांनी जातीवाचक शिवीगाळ केली. त्याच वेळी बिडकीनचे पोलीस निरीक्षक देहेडकर, तसेच हबीब मॅक्स काही गुंड घेऊन आला. त्यांनी खंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीची तक्रारही बिडकीन पोलीस ठाण्यात देहेडकर यांनी नोंदवून घेतली नाही. शेवटी खंदारे यांनी पैठण न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने वरील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.