तीन वर्षांचा सेवाकाळ समाप्तीकडे, आता दोनशे शिक्षणसेवक होतील पूर्णवेळ शिक्षक
By विजय सरवदे | Updated: August 23, 2022 18:50 IST2022-08-23T18:48:10+5:302022-08-23T18:50:14+5:30
शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणसेवकांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तीन वर्षांचा सेवाकाळ समाप्तीकडे, आता दोनशे शिक्षणसेवक होतील पूर्णवेळ शिक्षक
औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमध्ये १६ सप्टेंबर २०१९ रोजी शिक्षणसेवक म्हणून रुजू झालेले सुमारे २०० शिक्षणसेवक व पदवीधर शिक्षणसेवक पुढील महिन्यात तीन वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करत आहेत. त्यांना शिक्षकपदावर पूर्णवेळ सामावून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत.
शिक्षणसेवकांना दिवाळीपूर्वी नियमित करून त्यांना पूर्ण पगाराचा लाभ देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे व शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्याकडे केली होती. याची दखल प्रशासनाने घेतली आहे. शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणसेवकांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पीडीएफ प्रस्तावासोबत मागविलेल्या छायांकित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सादर करण्याचेही सूचित केले आहे.
यासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी सांगितले की, शिक्षणसेवक हे सहा हजार रुपये मानधनावर काम करत आहेत. शिक्षणसेवकांचा तीन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ व त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन याबाबतीत लक्षात घेऊन त्यांना शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी शिक्षणसेवकांना नियमित पगार चालू होईल, अशी अपेक्षा आहे.