छत्रपती संभाजीनगर : १९ वर्षांच्या चार मित्रांची भरधाव वेगात निघालेल्या कारने श्रेयनगरमध्ये काही वेळ स्थानिकांच्या हृदयाचे ठोके थांबविले होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, एका कारचे नुकसान करून चारही मित्र त्यांच्याच चुकीमुळे जखमी झाले. सोमवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.
अमोल सचिन देवकर (१९, रा.चेतक घोडा परिसर, जवाहरनगर) याच्यावर या घटनेप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर व त्याच्या अन्य मित्रांसह चारचाकी (एम एच २० - डीव्ही - ६५७८) घेऊन अमरप्रीत चाैकाकडून काल्डा कॉर्नरच्या दिशेने सुसाट वेगात निघाला होता. त्याच वेगात वळण घेत त्यांनी श्रेयनगरमध्ये प्रवेश केला. जीकेसी क्लाससमोर देवकरचा ताबा सुटल्याने कार नियंत्रणाबाहेर गेली. यात ठेकेदार संतोष व्यास (५५) यांच्या कारवर जाऊन आरोपीची कार धडकली. यात व्यास यांच्या कारचे नुकसान झाले, शिवाय देवकरचे कारमधील मित्रही जखमी झाले. व्यास यांनी या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली. निरीक्षक अतुल येरमे यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी देवकरवर गुन्हा दाखल केला.
या वसाहतीत त्रास, पोलिसांचे दुर्लक्षशहरात अल्पवयीन मुलांसह विशीतल्या तरुणांकडून सुसाट वाहने दामटली जातात. कॅनॉट प्लेस, निराला बाजार, औरंगपुरा, श्रेयनगर, उस्मानपुरा, न्यू उस्मानपुऱ्यातील दशमेशनगर, क्रांती चौकात तरुणांचे अनेक टोळके कर्कश आवाज करत सुसाट वाहने घेऊन फिरतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. यातून अनेक वेळेला या परिसरात वादही झाले. मात्र, पोलिस या टोळक्यांकडे साफ दुर्लक्ष करतात. सेव्हन हिल कॉलनी, सुराणानगर येथे काही दिवसांपासून एक १४ ते १५ वर्षांचा मुलगा बेफाम स्कूटी चालवत आहे, तसेच लोकमत भवनसमोरून व लोकमत भवनच्या मागील रस्त्यावर एक स्पोर्ट्स बाइकस्वार रोज रात्री साडेदहाच्या सुमारास साऱ्या वेगमर्यादा ओलांडत आहे. यामुळे मोठ्या अपघाताची भीती आहे. यांच्याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.