छत्रपती संभाजीनगर : वाळू तस्करीसाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून १ लाखांची लाच घेणाऱ्या सहायक महसूल अधिकारी काशिनाथ आनंदा बिरकलवाड (४१, रा. अजिक्यतारा अपार्टमेंट, होनाजीनगर) याला एसीबीने रंगेहाथ अटक केली. गुरुवारी रात्री ९ वाजता जालना रस्त्यावर रामगिरी समोर ही कारवाई करण्यात आली.
३६ वर्षीय तक्रारदार तरुण वाळू खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. ९ एप्रिल रोजी रात्री सदर व्यावसायिकाचा एक हायवा वाळूची वाहतूक करताना बिरकलवाडने रंगेहाथ पकडला. वरिष्ठांच्या नावाने कारवाईचा इशारा देत बिरकवालडने त्यांना कारवाई न करण्यासाठी प्रथम २ लाखांची मागणी केली. जागेवर तडजोडीअंती त्यांच्यात १ लाख १० हजार रुपयांवर अंतिम व्यवहार ठरला. बुधवारी रात्री ११:३० वाजता आरोपीने ७० हजार रुपये जागेवर स्वीकारून उर्वरित ४० हजार रुपये गुरुवारी देण्याची अट घातली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीचे अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप आटोळे यांच्याकडे लाचेची तक्रार केली.
आटोळे यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक केशव दिंडे यांनी तक्रारीची खातरजमा केली. बिरकलवाड लाच मागत असल्याची खात्री होताच दिंडे यांनी गुरुवारी रात्री सापळा रचला. बिरकलवाडने तक्रारदाराला रात्री ९ वाजता रामगिरी समोर ४० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. तडजोडीअंती तक्रारदाराने त्यांना ३० हजारांसाठी विनंती केली. निरीक्षक केशव दिंडे यांनी पथकासह सापळा रचला. बिरकलवाड दुचाकीवर येऊन उभा राहिला. तक्रारदाराने त्याला ३० हजार रुपये दिले. सूचनेप्रमाणे खिशातून रुमाल काढून घाम पुसण्याचा इशारा करताच दिंडे यांनी धाव घेत बिरकलवाडला रंगेहाथ ताब्यात घेतले. इकडे त्याच्यावर कारवाई होताच त्याच्या होनाजीनगरच्या घराची तपासणी सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.