आकांक्षापुढती गगन ठेंगणे..!
By Admin | Updated: December 31, 2016 23:29 IST2016-12-31T23:28:36+5:302016-12-31T23:29:21+5:30
उस्मानाबाद अमेरिका, जपान, जर्मनीसह विविध बारा देशांत चर्चासत्र तसेच कार्यशाळांना उपस्थिती लावली. ही कहानी आहे गोदावरी क्षीरसागर यांची.

आकांक्षापुढती गगन ठेंगणे..!
विशाल सोनटक्के उस्मानाबाद
गाव... तुळजापूर तालुक्यातील गंधोरा, शिक्षण... अवघे नववी इयत्ता, मोठा मुलगा अडीच वर्षांचा आणि लहान मुलगा सहा वर्षांचा असताना पतीचा झालेला अपघाती मृत्यू... मात्र, त्यानंतरही जिद्द सोडली नाही. आपल्यासारख्याच अनेक महिला कष्टप्रद जिणे जगत आहेत. या महिलांना एकत्रित करून त्यांना विकासाचा मार्ग दाखविण्यासाठी पुढाकार घेतला. आणि बघताबघता सात हजारावर शेतकरी महिलांचे संघटन उभे केले. अमेरिका, जपान, जर्मनीसह विविध बारा देशांत चर्चासत्र तसेच कार्यशाळांना उपस्थिती लावली. ही कहानी आहे गोदावरी क्षीरसागर यांची.
गोदावरी क्षीरसागर यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले अज्ञान होती. दु:खाचा हा डोंगर कोसळल्यानंतर त्या माहेरी गंधोऱ्याला राहू लागल्या. आईही अल्पशिक्षित असली तरी मुलीने दु:खाचा सामना करीत पुन्हा उभे रहावे, यासाठी प्रयत्न करीत होती. त्याच वेळी स्वयंशिक्षण प्रयोगमार्फत गंधोरा परिसरात बचत गट स्थापन करण्यात आला होता. क्षीरसागर यांच्या आई या बचत गटाच्या सदस्या असल्याने गोदावरी क्षीरसागरही गटाच्या मिटींगला जावू लागल्या. यासाठी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेबरोबर आईही प्रोत्साहन देत होती. मुलगी बाहेर पडली तर दु:ख विसरेल, अशी त्यांना आशा होती.
बचत गटाच्या मिटींगला उपस्थित राहत गोदावरी क्षीरसागर यांनी २००० साली यशवंती बचत गटाची स्थापना केली आणि या गटाच्या सचिव म्हणून कामाला सुरूवात झाली. त्यानंतर संस्थेने त्यांच्यावर सलगरा, दिवटी परिसरात महिला बचत गट उभारण्याची जबाबदारी सोपविली. या माध्यमातून परिसरातील गावात फिरणे वाढले. महिलांशी संवाद वाढला. त्यावेळी आपल्यासारख्याच अनेक महिला गरजू, निराधार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या महिलांसाठी आपण काही केले पाहिजे, ही भावना वाढीस लागली. त्यातूनच त्यांची बचत गट उभारणीची चळवळ सुरू झाली. यानंतर त्यांनी परिसरातील दहा गावांत फिरून बचत गट स्थापना, त्याची गरज तसेच बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यास सुरूवात केली. यावेळी त्या इतर क्लष्टरमधील बचत गटांनाही मदत करीत असत. २००६-०७ मध्ये त्यांनी तुळजापूर फेडरेशनच्या सचिव पदाची जबाबदारी घेतली आणि त्यानंतर कामाला वेग आला.
महिलांशी संवाद वाढल्यानंतर त्यांनी शेती आणि आरोग्य या दोन विषयांवर लक्ष केंद्रीत केले. या दोन बाबींचाच परिणाम महिलांच्या आरोग्यासह जीवनावर होतो, असे त्यांचे मत बनले. शेतीतील ८० टक्के कामे महिला करतात. मात्र, कधीही त्यांना शेतकरी म्हणून दर्जा मिळत नाही. तर मजूर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. महिलांतील कुपोषणाचे प्रमाणही असेच चिंताजनक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अनुषंगाने त्यांनी परिसरातील महिलांचा अभ्यास केला. दरम्यानच्या काळात ईटलीमध्ये होणाऱ्या अन्न सुरक्षा कायदा या विषयावर महिलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्तीला संधी मिळणार होती. ती संधी क्षीरसागर यांना मिळाली. तेथे जावून क्षीरसागर यांनी महिलांच्या संबंधी शेती आणि आरोग्य या संबंधीची परिस्थिती विषद केली. त्यानंतर २००७ मध्ये केनिया येथे झालेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या कामांच्या स्वरुपाबाबत आयोजित कार्यशाळेत त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. २००८ मध्ये फिलिपिन्स येथे महिला गटांनी व्यवसाय कसा केला पाहिजे, याबाबतची मांडणी केली तर २००९ मध्ये ईटलीमध्ये झालेल्या कार्यशाळेत अन्न सुरक्षेच्या संबंधी भारतातील महिलांची परिस्थिती त्यांनी जगासमोर मांडली.
२०१० मध्ये नेपाळ येथे झालेल्या एशिया प्लॅनिंग मिटींगमध्ये सहभाग नोंदविला, २०११ मध्ये अमेरिकेतील युएनओमीन या महिला हक्क परिषदेच्या कार्यकशाळेत शेतीमधील महिलांची परिस्थिती कथन केली. २०१२ मध्ये तुर्कस्तानमध्ये झालेल्या महिला हक्क परिषदेबरोबरच ब्राझिलमधील चर्चासत्रातही त्यांनी सहभाग नोंदविला. २०१३ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारतातील महिलांनी दुष्काळी काळात केलेल्या कामाची माहिती इतर देशातील प्रतिनिधींसमोर मांडली. २०१४ मध्ये बँकॉक येथे झालेल्या एशिया मिनिस्टर कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग नोंदविला तर २०१५ मध्ये जपान आणि २०१६ मध्ये जर्मनी येथे बचत गटाच्या माध्यमातून महिला सेंद्रीय पध्दतीची शेती कशा पध्दतीने करीत आहेत, आणि त्याचे काय फायदे होत आहेत, याची मांडणी केली. अवघे नववी इयत्ता शिक्षण झालेल्या गोदावरी क्षीरसागर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी केलेला प्रवास प्रेरणादायी तितकाच चित्तथरारक आहे.