इच्छुकांचे आता एकच ‘मिशन उमेदवारी’; तिकीटासाठी वेगवेगळ्या पक्षात लावून ठेवली 'फिल्डिंग'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:12 IST2025-12-18T19:11:33+5:302025-12-18T19:12:04+5:30
आपल्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षांचे पर्यायही चाचपून पाहिले जात आहेत.

इच्छुकांचे आता एकच ‘मिशन उमेदवारी’; तिकीटासाठी वेगवेगळ्या पक्षात लावून ठेवली 'फिल्डिंग'!
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. २३ डिसेंबरपासून सुरू हाेणार आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी आतापासूनच उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. आपल्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षांचे पर्यायही चाचपून पाहिले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत लढायचे, आता मागे हटायचे नाही, अशी भूमिका इच्छुकांनी घेतली आहे.
महापालिकेची मागील निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. २०२० मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होती, पण झाली नाही. आता २०२६ मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. एका प्रभागात कुठे १५ ते कुठे ३० पेक्षा अधिक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. एका प्रभागातून चौघांनाच उमेदवारी मिळेल. त्यातही महायुती, महाविकास आघाडी झाली तर इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आणखी कमी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पक्षातील काही ज्येष्ठांची मनधरणी सुरू केलेली आहे. तिकीट हमखास आपल्यालाच मिळणार, असा अनेकांना आत्मविश्वास वाटत असल्याने ते मीच उमेदवार अशी भविष्यवाणीही करीत आहेत. सर्वाधिक इच्छुकांची रांग भाजपाकडे आहे. त्या पाठोपाठ शिंदेसेना, एमआयएम, उद्धवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचितकडेही मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी केली जात आहे.
माजी नगरसेवक निवांत
सर्वच राजकीय पक्षांमधील माजी नगरसेवक तिकीट आपल्यालाच मिळेल या अर्विभावात दिसत आहेत. त्यातील काही जणांचा पत्ता यंदा कट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मागील वेळी हे नगरसेवक वॉर्डातून निवडून आले होते. आता त्यांना प्रभागातून लढायचे आहे. त्यामुळे ते विजयाची शक्यता काहीसी धूसर झाली आहे. त्यात सर्व पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांसाठी इलेक्टिव्ह मेरिट हा निकष लावला असून तशा सशक्त उमेदवारांचा शोध सुरू आहे.
आर्थिक स्थितीची चाचपणी
प्रभागाचे आकारमान व मतदार संख्या पाहता उमेदवारांना मोठ्या प्रमाणात ‘रसद’ लागणार आहे. उमेदवार मतदारांवर किती ‘माया’ उधळू शकतो याचाही अंदाज नेते घेत आहेत. एकजीवाचे व समतूल्य चार उमेदवार एकत्र असेल तरच निवडणूक काहीशी सोपी होईल. कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार प्रतिस्पर्धी असू शकतात, याचीही माहिती उमदेवारांकडून घेतली जात आहे. मंगळवारी एका पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये या सर्व बाबींचा उहापोह होत होता.