रस्ता विचारून सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले
By राम शिनगारे | Updated: May 5, 2023 21:20 IST2023-05-05T21:20:19+5:302023-05-05T21:20:45+5:30
उस्मानपुऱ्यातील घटना : जयभवानीनगरमध्ये शतपावली करणे पडले महागात

रस्ता विचारून सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले
छत्रपती संभाजीनगर : पहाटे सहा वाजेच्या सुमारास उस्मापुऱ्यातील देवानगरीत मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला एका भामट्याने बीड बायपासकडे कोणता रस्ता जातो, असे विचारले. महिलेने माहिती देताच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. तर गुरुवारी रात्री जयभवानीनगरमध्ये जेवणानंतर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरट्याने पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा व मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला.
अलका विलास मोहरील (६१, रा. अवधूत अपार्टमेंट, देवानगरी) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. ५ मे रोजी पहाटे त्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या सुमारास त्या देवानगरीतील मेन रोडवर वॉक करीत असताना दुचाकीस्वार दोन चोरटे त्यांच्याजवळ गेले. त्यांनी बीड बायपासकडे जाणारा रस्ता कोणता, असे विचारून अलका यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर लगेचच एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यावर दोघांनीही तेथून पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रतन डोईफोडे करीत आहेत.
जयभवानीनगमध्ये दोन ग्रॅमचा तुकडा पळवला
ज्योती उगले (रा. जयभवानीनगर) या एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. ४ मेच्या रात्री ९ वाजता जेवण केल्यानंतर त्या मावस बहीणीसोबत शतपावली करीत होत्या. त्यावेळी अंगात पिवळे जॅकेट व जिन्स पॅन्ट घातलेल्या चाेराने त्यांचा पाठलाग केला. गल्ली क्र. १ मध्ये गणपती मंदिराजवळ त्याने ज्योती यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि जयभवानी चौकाच्या दिशेने पोबारा केला. त्याचा पाठलाग केला असता तो दिसून आला नाही. दरम्यान, घटनास्थळी सोन्याची चेन पडलेली दिसली. अंदाजे २ ग्रॅमचा तुकडा चोराच्या हाती लागला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.