आश्रमशाळा प्राध्यापक संपावर
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:39:51+5:302014-08-23T00:45:05+5:30
परभणी : जिल्ह्यातील आश्रमशाळेला जोडलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी वेतनाच्या मागणीसाठी २१ आॅगस्टपासून महाविद्यालये बंद करुन संप पुकारला आहे.

आश्रमशाळा प्राध्यापक संपावर
परभणी : जिल्ह्यातील आश्रमशाळेला जोडलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी वेतनाच्या मागणीसाठी २१ आॅगस्टपासून महाविद्यालये बंद करुन संप पुकारला आहे.
राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २००८-०९ पासून १४७ कनिष्ठ महाविद्यालये आश्रमशाळांना जोडली आहेत. परंतु, या महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहा वर्षांपासून वेतन दिले गेले नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने ही कनिष्ठ महाविद्यालये आश्रमशाळेला जोडली. विशेष म्हणजे आश्रमशाळेतील वसतिगृह चालविण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम करणाऱ्या प्राध्यापकांना सहा वर्षांपासून वेतन दिले गेले नाही.
या संदर्भात शिक्षक आमदार, आश्रमशाळा संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन कृती समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला. २१ जुलै रोजी आझाद मैदानावर कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत हे आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे आता महाविद्यालयीन प्राध्यापकांनी जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तो पर्यंत महाविद्यालयात जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यात १० महाविद्यालये
आश्रमशाळांशी जोडलेली जिल्ह्यामध्ये दहा महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ६० ते ६५ प्राध्यापक असून त्यांचे वेतन रखडले आहे. ही सर्व महाविद्यालये २१ आॅगस्टपासून बंद ठेवण्यात आली आहेत.
शासनाने हे कनिष्ठ महाविद्यालये देताना वसतीगृह चालविण्यासाठी १०० टक्के अनुदानाची तरतूद केली आहे. परंतु, कर्मचाऱ्यांच्या अनुदानासाठी मात्र २०१२ पासून अनुक्रमे २५, ५०, ७५ व १०० टक्के अनुदानाची तरतूद शासन निर्णयात केली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी ७५ टक्के अनुदानास पात्र असतानाही त्यांना वेतन मिळालेले नाही.