श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ?
By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 17, 2024 18:42 IST2024-04-17T18:42:22+5:302024-04-17T18:42:40+5:30
रामनवमी विशेष: ज्यांना ‘पंजिरी’ हे नावच माहीत नाही, अशांना हे नाव ऐकल्यावर नवल वाटले असेल आणि अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल.

श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ?
छत्रपती संभाजीनगर : मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मोत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिरामध्ये दुपारी १२ वाजता प्रभूंचा जन्मोत्सव, पाळणा गीत व आरती करून साजरा करण्यात आला. यानंतर भाविकांना प्रसादरुपी ‘पंजिरी’ मिळाली.
ज्यांना ‘पंजिरी’ हे नावच माहीत नाही, अशांना हे नाव ऐकल्यावर नवल वाटले असेल आणि अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल. पिढ्यांपिढ्या रामनवमी व कृष्णजन्माष्टमीला मंदिरात ‘पंजिरी’चा प्रसाद दिला जातो. अनेकांनी यापूर्वी अनेकदा खाल्लीही असेल, पण त्या प्रसादाला ‘पंजिरी’ असे म्हणतात हे माहीत नसेल. मग जाणून घेऊ या...
कशाची बनते पंजिरी?
रामनवमीला प्रसाद म्हणून पंजिरी वाटप करण्याची प्रथा आहे. धणे, मखाणा, सुके खोबरे, खारीक, सुंठ, पिठीसाखर या सर्वांचे मिश्रण केले जाते. हे सर्व घटक भाजून घेतले जातात. त्यानंतर त्याची भुकटी केली जाते. यास पंजिरी असे म्हणतात. काही जण पंजिरीत काजू, बदामाचाही वापर करतात.
आयुर्वेदिक पंजिरी- उष्णतेवर रामबाण उपाय
पंजिरी खाल्ल्यास कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि तंतुमय घटक मिळतात. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. घामातून शरीरातील लोह बाहेर पडते. त्यामुळे थकवा येतो. एक चमचा पंजिरी खाल्ल्यास थकवा कमी होऊ शकतो. उन्हाळ्यात पाणी जास्त प्यायले जाते; पण लघवी कमी प्रमाणात होते. पंजिरीत धणे असल्याने लघवी साफ होऊन शरीरातील उष्णता कमी होते. यातील अन्य पदार्थांचाही शरीराला फायदा होतो. स्वादिष्ट पंजिरी पचायलाही सोपी असते.
-अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ
कोण बनवितात ‘पंजिरी’?
समर्थनगरातील श्रीराम मंदिरात ठरावीक भाविक ‘पंजिरी’ आणून देतात. तसेच, शहरातील काही मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने पंजिरी बनविली जाते. काही मंदिरांत भाविक स्वत: हून पंजिरी तयार करून आणून देतात.