छत्रपती संभाजीनगरात तब्बल १ हजार जेसीबी दाखल, पण खेळण्यातील; नागरिकांमध्ये कुतूहल
By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 1, 2025 19:38 IST2025-02-01T19:37:44+5:302025-02-01T19:38:10+5:30
जेसीबी काही अतिक्रमण पाडण्यासाठी किंवा खोदकाम करण्यासाठी नव्हे तर लहान मुलांना खेळण्यासाठी आणले आहेत...

छत्रपती संभाजीनगरात तब्बल १ हजार जेसीबी दाखल, पण खेळण्यातील; नागरिकांमध्ये कुतूहल
छत्रपती संभाजीनगर : शहरात एकसाथ तब्बल १ हजार जेसीबी दाखल झाले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्ली येथून हा जेसीबीचा ताफा आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जेसीबी शहरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील विविध भागांत रस्त्याच्या कडेला या जेसीबींची पार्किंग करण्यात आली असून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी हे जेसीबी कुतूहलाचा विषय बनले आहेत.
जेसीबी काही अतिक्रमण पाडण्यासाठी किंवा खोदकाम करण्यासाठी नव्हे तर लहान मुलांना खेळण्यासाठी आणले आहेत... मध्य प्रदेशातील १० विक्रेते हे जेसीबी शहरात घेऊन आले आहेत. तीन वर्षांपूर्वी शहरात सर्वप्रथम खेळणीतील नॅनो ट्रॅक्टर दाखल झाले होते. त्यानंतर हायवा, जीप, बस आणि आता जेसीबीची खेळणी आली आहे.
मेड इन दिल्ली जेसीबी
छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आलेल्या जेसीबी या खेळणीचे उत्पादन दिल्ली राज्यात होत आहे. दिल्ली व आसपासच्या परिसरात खेळणी उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टॉय असोसिएशन ऑफ इंडियाच्या मध्ये देशात खेळणी बनविणारे ६ हजारांपेक्षा अधिक युनिट कार्यरत आहेत. त्यातील फक्त १५०० युनिटने ‘बीआयएस’ प्रमाणपत्र घेतले आहे. देशात आजघडीला गुजरात टॉय मॅन्युफॅक्चरिंगचा सर्वांत मोठा हब बनला आहे.
खेळणी उत्पादनात स्टार्टअपला वाव
खेळणी निर्माण क्षेत्रात स्टार्टअपला मोठा वाव आहे. छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीत खेळणी निर्माण उद्योग उभारले, तर अनेकांना रोजगार मिळू शकेल. नवउद्योजकांनी यादृष्टीने विचार करायला हवा, रस्त्यावरील खेळणी ‘बीआयएस’ प्रमाणित नसते. खेळणी घेताना याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.
- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॅट.
भारताच्या खेळण्या ३३ देशात निर्यात :
१) पूर्वी भारतात खेळणी बाजारपेठेत मेड इन चायनाचा दबदबा होता.
२) केंद्र सरकारने भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी व निर्यात वाढविण्यासाठी बेसिक कस्टम्स ड्यूटी ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली.
३) देशात ‘बीआयएस’ मानांकन लागू झाल्याने चीनहून आयात घटली आहे.
४) वर्ष २०१५ ते २०२३ दरम्यान भारतात निर्मित खेळण्यांच्या निर्यातीत २३९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. आयातीत ५२ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
५) ‘मेड इन इंडिया खेळण्या’ जगातील ३३ देशांत निर्यात होत आहेत.
६) मार्केट रिसर्च फर्म ‘आयएमएआरसी’च्या रिपोर्टनुसार भारतातील टॉय इंडस्ट्रीची व्हॅल्यू मागील वर्षी १.७ अरब डॉलर होती. २०३२ पर्यंत ४.४ अरब डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली आहे.