व्यवस्था कालबाह्य
By Admin | Updated: August 4, 2014 01:56 IST2014-08-04T01:37:19+5:302014-08-04T01:56:45+5:30
औरंगाबाद : नागरिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारामुळे माओवादी निर्माण होत आहेत

व्यवस्था कालबाह्य
औरंगाबाद : नागरिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारामुळे माओवादी निर्माण होत आहेत. जातीय दंगलीतून दोन समाजात दरी निर्माण होऊन आतंकवादी विचारांना पोषक वातावरण तयार होते आणि आतंकवाद जन्माला येतो. व्यवस्था कालबाह्य झाल्याने हे घडत आहे, असे प्रतिपादन माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केले.
औरंगाबाद सामाजिक मंच आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेतर्फे आयोजित ‘सामाजिक सलोखा’ या विषयावर ते रविवारी मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष गायकवाड हे होते. खोपडे पुढे म्हणाले की, गडचिरोली भागात माओवादी वाढण्याचे कारण तेथील नागरिकांच्या मनात आपण व्यवस्थेचे बळी आहोत, अशी भावना निर्माण झाली आहे. १९८४ मध्ये गडचिरोलीतील मुली आणि महिला नवीन व्यक्तीशी बोलत नव्हत्या. सध्या परिस्थिती बदलली आहे. तरुण मुली माओवादी बनत आहेत. याला राजकीय आणि सामाजिक व्यवस्था जबाबदार आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे नियंत्रणात आणणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास अद्यापही झाला नाही. विदेशातील खेडी पाहिल्यानंतर आपण कोठे आहेत, असा प्रश्न निश्चित पडतो. सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे. भारतानंतर चीन दोन वर्षांनी स्वतंत्र झाला असतानाही विकास अधिक झालेला आहे.
धर्म, राजकारण, समाज आणि पोलीस या विषयावर सुरेश खोपडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे संपूर्ण व्यवस्थेचे चित्रण मांडले. सर्व व्यवस्थेचा समाजावर कसा परिणाम होतो हे प्रेझेंटेशनद्वारे सादर केले.
व्यवस्था सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे नमूद केले.