जिल्ह्यातील चार महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:14+5:302021-02-05T04:11:14+5:30
भगवान कॉलेज ऑफ फार्मसी : तंत्रशिक्षण सहसंचालकांची कार्यवाही औरंगाबाद : शासनाच्या आदेशानुसार भगवान कॉलेज ऑफ फार्मसीमधील द्वितीय व तृतीय ...

जिल्ह्यातील चार महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची व्यवस्था
भगवान कॉलेज ऑफ फार्मसी : तंत्रशिक्षण सहसंचालकांची कार्यवाही
औरंगाबाद : शासनाच्या आदेशानुसार भगवान कॉलेज ऑफ फार्मसीमधील द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांंना जिल्ह्यातील चार फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी दिली.
मागील दोन वर्षांपूर्वी सन २०१८-१९मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने येथील भगवान कॉलेज ऑफ फार्मसीची मान्यता काढली होती व या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त संस्थांमध्ये ३० दिवसांत समायोजित करण्याचे आदेश दिले होते. तथापि, या निर्णयास रेणुका संजय आंबेकर व इतर विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंठपीठात आव्हान दिले. याप्रकरणी उच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राज्य शासन, संबंधित व्यवस्थापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत सर्वसमावेशक तोडगा काढावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर १३ मार्च २०१९ रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी भगवान कॉलेज ऑफ फार्मसीने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संस्था पुढे चालू ठेवण्याबाबत अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने संस्थेच्या उत्तराची वाट न पाहता शासनाने योग्य पाऊले उचलावीत, असे निर्देश दिले.
येथील दुसर्या व तिसर्या वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न औरंगाबाद शहर अथवा जवळच्या फार्मसी कॉलेजेसमध्ये वर्ग करण्याची विनंती शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने काल १ फेब्रुवारीला एका आदेशाद्वारे या कॉलेजमधील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील फार्मसी कॉलेमध्ये रिक्त जागांवर वर्ग करण्याचे आदेश जारी केले आहेत. फार्मसी कॉलेजेसमध्ये रिक्त जागा नसल्यास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मान्यतेच्या अधीन राहून १० टक्के वाढीव जागांच्या मर्यादेत गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यानुसार तंत्रशिक्षण कार्यालयाने जिल्ह्यातील ४ फार्मसी कॉलेजेसमध्ये या विद्यार्थ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू केली आहे.
चौकट...
विद्यार्थी हिताचा निर्णय
यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले की, या महाविद्यालयातील २५-३० विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे. राज्य शासनाने या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम्ही जिल्ह्यातील चार फार्मसी कॉलेजेसमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अन्यथा आम्ही मराठवाड्यात जिथे जागा शिल्लक आहेत, त्याठिकाणी प्रवेश दिला असता.