पावणदोन एकरात ७० क्विंटल हळद

By Admin | Updated: July 7, 2014 00:32 IST2014-07-06T23:56:16+5:302014-07-07T00:32:58+5:30

भास्कर लांडे, हिंगोली दरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला.

Around 70 quintals of Turmeric powder | पावणदोन एकरात ७० क्विंटल हळद

पावणदोन एकरात ७० क्विंटल हळद

भास्कर लांडे, हिंगोली
दरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला. त्याला हिंगोलीत उपलब्ध असलेल्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजारपेठेमुळे अधिकच वाव मिळाला. त्याचा फायदा उठवित उपलब्ध पाण्यात, आहे त्या जमिनीत, खत, बी, फवारणीच्या वेळेचे योग्य नियोजन जीवन क्यातमवार यांनी केले. त्याचा परिपाक पावणे दोन एकरात ७० हजारांच्या खर्चात वाळून ७० क्विंटल हळद झाल्याने सव्वाचार लाखांचे उत्पन्न काढण्याची किमया माजी सैैनिकाने केली.
औंढा तालुक्यातील जामगव्हाण येथील जीवन क्यातमवार यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीत वेळ घालविण्याचा ठरविले. ‘पाण्याविना शेती अन् शेतकऱ्याची माती’ या म्हणीनुसार त्यांनी शेतात बोअर घेतला. योगायोगाने बऱ्यापैैकी पाणी लागल्याने शेती फुलविता आली. पाण्याची उपलब्धता झाली तरी केळी, संत्रा, पपई आदी फळपिके घेण्यापुरते भरमसाठ पाणी नव्हते. अधिक पाण्याचे पिकही घेता येत नव्हते आणि सात एकरातील पिकांना पाणी पुरत नव्हते. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाने शेतकऱ्यांना बेजार केले होते. भरमसाठ खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नव्हते. उलट जमिनीतील कस नाहीसा होत होता. सुरूवातीला एक-दोन वर्षांत क्यातमवार यांना कापसाच्या पिकाचा अनुभव वाईट आला. म्हणून कापसाला दूर लोटीत क्यातमवार यांनी हळदीला जवळ केले. हळद पिकविण्यापेक्षा विकण्याला सर्वात महत्व असते. प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने हळदीला नकारले जाते; पण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ हिंगोलीत आहे. वर्षभर बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम भाव मिळतो. शिवाय हळदीलाही रास्त भाव मिळत असल्याचे पाहून क्यातमवार यांनी गतवर्षी मृगनक्षत्रात पावणे दोन एकर जमीन हळद लागवडीसाठी तयार केली. जमिनीची योग्य मशागत करून शेलम जातीच्या १५ क्विंटल बियाण्यांची लागवड बेड पद्धतीने केली. २१ दिवसानंतर निघालेल्या हळदीला बरोबर एक महिना झाल्यानंतर पोटॅश आणि १०:२४:२४ खताचे सात पोते टाकले. दरम्यान पीक वाढत जात असताना कोळपणी, निंदणी करण्यात आली. हळदीला माल लागतेवेळी ६ पोते डीएपी आणि चार पोते पोटॅश खताचा दुसरा डोस दिला. एकीकडे पीक वाढत असताना आलेल्या धुईमुळे रोगराईचे आक्रमण होत राहिले. खासकरून बुरशीची वाढ होत राहिल्याने चारवेळेस फवारणी करावी लागली. मान्सूनचा पाऊस संपताच ठिबकद्वारे पिकास पाणी दिले. परिणामी पाण्याची बचत झाली, पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्याने फळधारणा चांगली झाली. नुकत्याच संपलेल्या हंगामात काढण्यात आलेली हळद वाळविण्यात आली. वाळवून मोजलेली हळद ७० क्विंटल भरली. दुर्देवाने बाजारभाव घसरून ६ हजारांवर आल्याने हळद विक्री लांबविली. वर्षभर दिवसरात्र एक करून लावलेली हळद विक्रीला येताच भाव घसरल्याने क्यातमवार निराश झाले; परंतु आजघडीला उपलब्ध ६ हजारांच्या भावात ७० क्विंटल हळद विकली तरी सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. केवळ ७० हजारांच्या खर्चात यापूर्वी कोणत्याही पिकाचे उत्पादन झाले नव्हते. कितीही खर्च केला तरी कापूस अपेक्षीत उत्पादन देत नव्हता; पण हळदीने केलेल्या खर्चाची चीज करीत विक्रमी ७० क्विंटल उत्पादन दिले.
आता हळदीच्या रूपयाने नगदी पिकात पर्याय मिळाला. तर कमी खर्चात, कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेण्याचा आटोपही आल्याचे क्यातमवार म्हणाले.

Web Title: Around 70 quintals of Turmeric powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.