सेनेतील पदाधिकारीही पक्षांतराच्या वाटेवर !
By Admin | Updated: January 6, 2017 00:25 IST2017-01-06T00:22:04+5:302017-01-06T00:25:25+5:30
कळंब : शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

सेनेतील पदाधिकारीही पक्षांतराच्या वाटेवर !
कळंब : शहराच्या राजकारणातील पक्षांतर करण्याच्या घटनेचा पहिला अंक बुधवारी संपला असताना आता आगामी काही दिवसात आणखी एक पक्षांतराचा दुसरा अंक रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
कळंब शहरातील काँग्रेसचे नगरसेवक व इतर काही पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. न. प. निवडणुकीनंतर काँग्रेसच्या या मंडळींनी सेनेत जायचा निर्णय घेतला असे सांगितले जात असले तरी न.प. निवडणुकीच्या आधीच हे सर्व राजकारण शिजले होते. असा दावा आता सेनेतून काही कार्यकर्ते करु लागले आहेत. न.प. निवडणुकीत सेनेच्या शहरातील काही कार्यकर्त्यांनी काँगे्रसचा आतून प्रचार केला होता. काँगे्रसच्या एका नगरसेवकाला निवडून आणण्यासाठी सेनेच्या एका उमेदवाराला त्या प्रभागातही फिरकु दिले नव्हते. सोबतच्या उमेदवारालाही दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छायाताई कुंभार व प्रभाग क्रं. १ मधील उमेदवार पांडूरंग कुंभार यांना पराभूत करण्यासाठी सेनेतील एका नेत्याने काँग्रेसला मदत केल्याचा थेट आरोप काही नाराज शिवसैनिकांतून केला जातो आहे. याच नेत्याने निवडणुकीनंतर काँग्रेसच्या या गटाला सेनेमध्ये घेण्यासाठी पुढाकार घेवून या पाडापाडीच्या राजकारणात समाविष्ट असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केल्याचेही या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
काँग्रेसमधून फुटून सेनेमध्ये आलेल्या या गटाच्या पक्ष प्रवेशावेळी मुंबई येथे शहरातील काही मंडळी आवर्जूून उपस्थित होती. त्यावरुन हा सर्व कारभार न.प. निवडणुकीपूर्वीच करण्यात आला होता असा दावाही हे कार्यकर्ते करीत आहेत. कुंभार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले होते. परंतु स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाची प्रतिष्ठा घालविणाऱ्या या घरभेद्यांना पक्षाने अभय दिल्यास चुकीचा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल, अशी चिंताही या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. एकूणच सेनेतील कुंभार यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.
कुंभार यांनी आधीच पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने ते कोणत्या पक्षात जातात याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यास या पक्षांना आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे या तीनही पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कुंभार यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतला नसला तरी त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.(वार्ताहर)