छत्रपती संभाजीनगर : तलवार, गुप्तीसारख्या शस्त्रधारी चोरट्यांनी बीड बायपास परिसरात धुमाकूळ घालत थेट पोलिसांनाच आव्हान दिले. गुरुवारी मध्यरात्री या टोळीने एका फ्लॅटमध्ये प्रवेश केला. ही बाब कळताच नागरिक जमा झाले. त्यांनी आरडाओरड सुरू करताच चोरट्यांनी त्यांच्यावर शस्त्रे उगारून पोबारा केला. सुदैवाने यात रहिवासी जखमी झाले नाहीत. यामुळे परिसरातील नागरिक मात्र, भयभीत झाले आहेत.
एमआयटी महाविद्यालयाच्या विरुद्ध दिशेला द्वारकादासनगरात मध्यरात्री १:३० ते २ या वेळेत थरार घडला. परिसरातील चंद्रमाऊली अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाला १ वाजेच्या सुमारास चोरटे संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे दिसले. काही अंतरावर त्यांनी सुमंगल रेसिडेन्सीमध्ये प्रवेश केला. सदर सुरक्षारक्षकाने तत्काळ तेथीलच दुसऱ्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला कॉल करून हा प्रकार कळवल्याने रहिवाशांपर्यंत ही बाब पोहोचली. काही वेळात स्थानिक नागरिक सुमंगल रेसिडेन्सीच्या खाली जमा झाले. त्यांचा आरडाओरड ऐकून चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये येत पळण्याचा प्रयत्न केला.
१ मिनिट २० सेकंदांचा थरार- नागरिकांनी रस्त्यावर काठ्या आदळून आरडाओरड सुरू केला. त्यानंतरही चोर फ्लॅटमध्ये ऐवज शोधत होते. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर येताच त्यातील एकाने तलवार, दुसऱ्याने गुप्ती, तिसऱ्याने लोखंडी रॉड हातात घेत जीवे मारण्याची धमकी दिली. स्थानिकांनी त्यांच्यावर दगडही फेकले.- चोरांनी विनाक्रमांकाची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ते सातत्याने शस्त्र उगारून धमकावत होते.- एका चोराने पायीच पळ काढला. एकाने दुचाकी काढेपर्यंत अन्य दोघांनी रहिवाशांना तलवार, गुप्तीचा धाक दाखवत दूर ढकलले आणि दुचाकीवर बसून पोबारा केला.
अन्य फ्लॅट बाहेरून बंद केलेसुमंगल रेसिडेन्सीमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरांनी सर्व फ्लॅटचे दरवाचे बाहेरून बंद केले. त्यानंतर गावाला गेलेल्या माधुरी कोल्हे यांचा फ्लॅट फोडला. त्या गावाला असल्याने चोरीचा ऐवज कळू शकला नाही. मकर संक्रांतीला याच सोसायटीत एक फ्लॅट, वीस दिवसांपूर्वी एक मेडिकल फोडण्यात आल्याचे रहिवासी ईश्वर पारखे यांनी सांगितले
रात्री राजराेस चोर, शस्त्रधारी गुंडांचा वावररात्री सातत्याने घरफोडी, शटर उचकटवून दुकाने फोडली जात आहे. त्या तुलनेत गुन्ह्यांची उकल मात्र होत नाही. शहरात ठिकठिकाणी चोर, गुंड, शस्त्रधारी टवाळखोरांचा वावर राजरोस वावर वाढल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका होत आहे, तर नागरिकही भयभीत झाले आहेत.